मुस्लिम गुन्हेगारी प्रवृत्तीचे; देशातल्या 50 टक्के पोलिसांची धारणा- रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 12:37 PM2019-08-28T12:37:05+5:302019-08-28T12:37:14+5:30
देशातल्या 50 टक्के पोलिसांना वाटतं की, मुसलमान हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात.
नवी दिल्लीः देशातल्या 50 टक्के पोलिसांना वाटतं की, मुसलमान हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात. 'स्टेटस ऑफ पोलिसिंग इन इंडिया रिपोर्ट 2019'मध्ये असा दावा करण्यात आला आहे. सर्वेक्षणादरम्यान 35 टक्के पोलिसांनी सांगितलं की, गोहत्येच्या प्रकरणात कथित आरोपीला जमावानं मारणं हे स्वाभाविक आहे. तर दुसरीकडे 43 टक्के पोलिसांना वाटतं की, एखाद्या आरोपीला जमावानं चोप देणं यात चुकीचं काहीच नाही. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. चेलमेश्वर यांनी एनजीओ कॉमन कॉज अँड सेंटर ऑफ द स्टडी ऑफ डेवलपिंग सोसायटीच्या लोकनीती कार्यक्रमाद्वारे तयार करण्यात आलेला हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
देशातल्या 21 राज्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं असून, पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या 12 हजार पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या 11000 कुटुंबीयांच्या मतांची दखल घेण्यात आली आहे. सर्वेक्षणात 37 टक्के पोलीस कर्मचाऱ्यांना वाटतं, की किरकोळ गुन्ह्यांसाठी न्यायालयात हजर करण्याऐवजी पोलिसांकडेच एखादी छोटीशी शिक्षा सुनावण्याचा अधिकार देण्यात आला पाहिजे. तर 72 टक्के पोलिसांना एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची चौकशी करण्याच्या प्रकरणात राजकीय दबावाचा अनुभव आला आहे. सर्वेक्षणानुसार, देशातले पोलीस दररोज सरासरी 14 तास काम करत आहेत. तर 80 टक्के पोलीस अधिकारी आठ तासांहून अधिक वेळ कर्तव्य बजावतात. देशातले 50 टक्के पोलीस ओव्हरटाइम करतात.
- एससी-एसटी ऍक्टअंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे
एससी-एसटी ऍक्टअंतर्गत दाखल करण्यात आलेले जास्त करून गुन्हे हे खोटे आहेत. काही जण विशिष्ट हेतूने असे गुन्हा दाखल करून कायद्याचा दुरुपयोग करत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.