काश्मिरात यावर्षी ५० अतिरेक्यांना केले ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 04:05 AM2020-04-25T04:05:40+5:302020-04-25T04:06:14+5:30
लॉकडाऊनमध्ये १८ अतिरेकी मारले; चकमकीत १७ जवान शहीद
जम्मू : जम्मू-काश्मिरात यावर्षी आतापर्यंत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाच्या अनेक कमांडरसह ५० अतिरेकी मारले गेले आहेत. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की, अतिरेक्यांविरुद्धच्या मोहिमेत या काळात १७ जवान शहीद झाले आहेत.
अतिरेक्यांनी गत चार महिन्यांत ९ जणांची हत्या केली आहे. यातील १८ जण हे लॉकडाऊनच्या काळात मारले गेले आहेत. १५ मार्च रोजी दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दियालगाम भागात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत लष्करचा जिल्हा कमांडर मुजफ्फर अहमद भट याच्यासह चार अतिरेकी ठार झाले होते.
२५ जानेवारी रोजी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात त्राल भागात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी मारले गेले होते. यात जैशचा स्वयंभू काश्मीर प्रमुख कारी यासीर याचाही सहभाग होता. २३ जानेवारी रोजी अन्य एक कमांडर अबू सैफुल्ला हा पुलवामा जिल्ह्यात मारला गेला होता.
९ एप्रिल रोजी उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सोपोरमध्ये सुरक्षा दलाने जैशचा कमांडर सज्जाद नवाब डार याला ठार मारले होते. हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर हारुण वानी हा १५ जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या डोडा गुंडाना भागात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत मारला गेला होता.
या काळात अतिरेक्यांनी ९ सामान्य नागरिकांची हत्या केली, तर १७ जवान शहीद झाले. यात १३ सुरक्षारक्षक, तीन विशेष पोलीस अधिकारी आणि एक पोलीस यांचा समावेश आहे. पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले की, गतवर्षी जम्मू-काश्मीरमध्ये १६० अतिरेकी मारले गेले होते आणि १०२ अतिरेक्यांना अटक करण्यात आली होती.
राजौरी जिल्ह्यात पाककडून तोफमारा
पाकिस्तानच्या लष्कराने शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील ठाणी आणि खेड्यांत तोफमारा केला. या माºयाला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले, असे संरक्षण प्रवक्त्याने सांगितले.
सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पाकिस्तान लष्कराने राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये कोणतेही कारण नसताना शस्त्रसंधीचे उल्लंघन करून छोट्या शस्त्रांतून गोळीबार आणि उखळी तोफांतून मारा सुरू केला. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने गोळीबार आणि तोफामारा करण्याचा हा सलग १७ वा दिवस आहे.
अपहृत पोलिसाची सुटका
काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात घरातून अपहरण करण्यात आलेल्या एका पोलिसाची अतिरेक्यांनी सुटका केली आहे. कॉन्स्टेबल जावेद जब्बार यांना गुरुवारी रात्री अतिरेक्यांनी घरातून उचलून नेले होते. त्यानंतर काही तासांत त्यांची सुटका करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुटी घेऊन जावेद हे आपल्या घरी आले असताना गुरुवारी रात्री ९.४० वाजता त्यांचे अपहरण झाले होते.