५००, १००० रुपयांच्या नोटा रद्द, ३० डिसेंबरपर्यंत नोटा बदलून मिळणार

By admin | Published: November 9, 2016 05:26 AM2016-11-09T05:26:32+5:302016-11-09T10:21:22+5:30

काळा पैसा, नकली नोटा व भ्रष्टाचार या अर्थव्यवस्थेला खिळखिळ्या करणाऱ्या तीन प्रमुख गोष्टींचे उच्चाटन करण्याचा उपाय म्हणून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून

500, 1000 rupees cancellation, can be changed by December 30 | ५००, १००० रुपयांच्या नोटा रद्द, ३० डिसेंबरपर्यंत नोटा बदलून मिळणार

५००, १००० रुपयांच्या नोटा रद्द, ३० डिसेंबरपर्यंत नोटा बदलून मिळणार

Next

नवी दिल्ली : काळा पैसा, नकली नोटा व भ्रष्टाचार या अर्थव्यवस्थेला खिळखिळ््या करणाऱ्या तीन प्रमुख गोष्टींचे उच्चाटन करण्याचा उपाय म्हणून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा क्रांतिकारी व धाडसी निर्णय केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केला.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर टीव्हीवरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. प्रामाणिकपणे पैसे कमावणाऱ्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही. त्यांचा पैसा सुरक्षित आहे व तो सुरक्षितच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
काळा पैसा, भ्रष्टाचार, नकली नोटा व दहशतवाद या गोष्टी देशाच्या प्रगतीस व अर्थव्यवस्थेस वाळवीसारख्या पोखरत आहेत. गेल्या अडीच वर्षांत १.२५ लाख कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर काढण्यात आला आहे. सीमेच्या पलीकडून आपला शत्रू बनावट चलनी नोटा पेरत आहे, असे मोदी म्हणाले.
या उपायांनी पुढील काही दिवस नागरिकांना त्रास व गैरसोय सोसावी लागेल, परंतु प्रत्येक नागरिकास देशासाठी काहीतरी करण्याची संधी क्वचित मिळत असते. सरकारने योजलेले हे उपाय ही अशीच एक संधी आहे. सरकारने हाती घेतलेल्या शुद्धिकरणाच्या या महायज्ञात नागरिकांनी मनापासून सहभागी होऊन या संधीचे सोने करावे, असे कळकळीचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे करण्यात आलेल्या पर्यायी व्यवस्थांची सविस्तर माहितीही आपल्या भाषणातून दिली.


पाचशे, हजारच्या नोटा घेण्यास नकार!
पंतप्रधानांचे निवेदन सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर एकच गोंधळ उडाला. मध्यरात्री बारापर्यंत नोटा स्वीकारल्या जाव्यात, असे खुद्द पंतप्रधान व रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी स्पष्ट केल्यानंतरही पेट्रोल पंप, मेडिकल स्टोअर्स, दुकानदार हे पाचशे, हजारच्या नोटा स्वीकारत नसल्याचे अनेक फोन ‘लोकमत’च्या कार्यालयात आले. केवळ पाचशे, हजारच्या नोटा असलेल्या लोकांची मोठी अडचण झाली.


७२ तासांसाठी खास व्यवस्था
सामान्य लोकांची अडचण होऊ नये, त्यासाठी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा ९, १०, ११ नोव्हेंबर रोजी म्हणजे ७२ तासांसाठी पुढील ठिकाणी स्वीकारल्या जातील.

सरकारी बससेवेच्या तिकीट खिडक्या
विमान कंपन्यांचे तिकीट काउंटर
सरकारी रुग्णालये सरकारी कंपन्यांचे पेट्रोल, डिझेल व गॅस पंप
केंद्र, राज्य सरकार पुरस्कृत सहकारी ग्राहक संस्था
राज्य सरकारी दूध विक्री केंद्रे रेल्वेच्या तिकीट व आरक्षण खिडक्या स्मशान आणि दफनभूमी

९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून
५०० आणि १००० रुपयांच्या सध्याच्या नोटा चलनात राहणार नाहीत.

नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा त्यांच्या बँकेत जमा करून त्याबदल्यात दुसऱ्या नोटा घेण्यासाठी १० नोव्हेंबर
ते ३० डिसेंबर अशी



50
दिवसांची मुदत असेल.


बँकेतून नोटा बदलून घेण्यासाठी रकमेची कोणतीही मर्यादा असणार नाही व एक व्यक्ती एका वेळी कितीही नोटा जमा करून बदलून घेऊ शकेल.

५०० रुपये आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा टप्प्याटप्प्याने चलनात आणण्यात येतील. या नव्या नोटा जसजशा पुरेशा संख्येने उपलब्ध होतील तशा
त्या जनतेला उपलब्ध करून देण्यात येतील.


९ नोव्हेंबर रोजी देशभर सर्व एटीएम व बँकांचे व्यवहार पूर्णपणे बंद राहतील.
तसेच १० नोव्हेंबर रोजी काही ठिकाणची एटीएम बंद राहतील.

ज्यांना या मुदतीत बँकेतून नोटा बदलून घेणे शक्य होणार नाही त्यांना कोणत्याही बँकेत, मुख्य किंवा सब पोस्ट आॅफिसमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड यासारखा कोणताही ओळख पटविणारा पुरावा दाखवून ३१ मार्च २०१७ पर्यंत या नोटा बदलून घेता येतील.


१० नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या काळात नोटा बदलून घेण्यासाठी चार हजार रुपये ही मर्यादा असेल. २५ ते ३० नोव्हेंबर या काळात ही मर्यादा वाढविण्यात येईल.
ज्यांना काही कारणाने ३० डिसेंबरपर्यंतही वरीलप्रमाणे नोटा बदलून घेणे शक्य होणार नाही त्यांना ३१ मार्च २००१७ पर्यंत रिझर्व्ह बँकेच्या विहित कार्यालयांत जाऊन त्या बदलून घेता येतील. मात्र त्या ठिकाणी त्यांना एक ‘डिक्लरेशन फॉर्म’ भरून द्यावा लागेल.

Web Title: 500, 1000 rupees cancellation, can be changed by December 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.