क्लबच्या लॉकरमध्ये ५०० कोटींचे घबाड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:32 PM2018-07-22T23:32:13+5:302018-07-22T23:32:46+5:30

बॉवरिंग इन्स्टिट्यूट या श्रीमंती क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवरील तीन लॉकर्समध्ये कोट्यवधी रुपयांचे घबाड मिळाल्याने खळबळ

500 crore hoaxes in club lockers! | क्लबच्या लॉकरमध्ये ५०० कोटींचे घबाड!

क्लबच्या लॉकरमध्ये ५०० कोटींचे घबाड!

Next

बंगळुरू: येथील सेंट मार्क्स रोडवरील बॉवरिंग इन्स्टिट्यूट या श्रीमंती क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवरील तीन लॉकर्समध्ये कोट्यवधी रुपयांचे घबाड मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
बांधकाम उद्योगात मोठी गुंतवणूक असलेल्या अविनाश अमरलाल कुकरेजा यांचे हे घबाड असल्याचे कळते. क्लबच्या व्यवस्थापनाने आधी पोलिसांना व त्यांच्यामार्फत प्राप्तिकर विभागास खबर दिल्यानंतर लॉकर्समधील हे सर्व सामान जप्त करून कुकरेजा यांची चौकशी सुरू केली आहे.
बॅडमिंटन कोर्टवरील तीन लॉकर्समध्ये हे घबाड मिळाले. त्यात ५०० कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तांची कागदपत्रे, ७.८ कोटी रुपयांचे रत्नजडित दागिने, ३.९ कोटी रुपयांचे परकीय चलन, दोन हजार रुपयांच्या १.८ कोटींच्या नव्या नोटांची बंडले व २० लाख रुपये किंमतीची सोन्याची ६५० ग्रॅम वजनाची बिस्किटे यांचा समावेश आहे.
कुकरेजा यांचे कुटुंब मुळचे राजस्थानमधील आहे. अविनाश क्लबचे सभासद असून त्यांनी हे तीन लॉकर अवैधपणे बळकावले होते, असे सूत्रांनी सांगितले. अविनाश यांचे क्लबमध्ये येणे अधूनमधन असले तरी त्यांच्या आई मात्र क्लबमध्ये पत्ते खेळण्यासाठी येत, असेही सांगण्यात आले. क्लबमध्ये टेनिस, बॅडमिंटन यासारख्या खेळांची सोय असून अशा प्रत्येक ठिकाणी स्वच्छतागृहांशेजारी लॉकर आहे. बरेच लॉकर वर्षानुवर्षे बंद असल्याचे आढळल्याने क्लबने सर्व सभासदांना लॉकर उघडून त्यातील सामानाची ओळख पटवावी, असे सांगितले होते.
ज्या सभासदांनी लॉकर स्वत:हून उघडले नाहीत, ते क्लबच्या व्यवस्थापनातर्फे उघडण्यात आले. या तीन लॉकर्समध्ये हे घबाड मिळाल्यानंतर ते कडीकुलपात ठेवले गेले. नंतर पोलिसांना बोलावून त्यांच्या उपस्थितीत त्या संपत्तीची मोजदाद करण्यात आली. (वृत्तसंस्था).

Web Title: 500 crore hoaxes in club lockers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.