30 डिसेंबरनंतर 500, एक हजाराच्या जुन्या नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई?
By admin | Published: December 26, 2016 08:33 PM2016-12-26T20:33:16+5:302016-12-26T21:17:45+5:30
चलनातून बाद झालेल्या 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तसेच बँकेत जमा करण्यासाठी दिलेली मुदत संपण्यास आता केवळ चार दिवसांचा अवधी उरला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर चलनातून बाद झालेल्या 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तसेच बँकेत जमा करण्यासाठी दिलेली मुदत संपण्यास आता केवळ चार दिवसांचा अवधी उरला आहे. याचदरम्यान 30 डिसेंबरनंतर चलनातून बाद झालेल्या नोटा बाळगणाऱ्यांवर सरकार कडून कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.
येत असलेल्या वृत्तांनुसार सरकार चलनातून बाद झालेल्या नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या विचारात आहे. त्यानुसार 500 आणि एक हजार रुपयांच्या दहा किंवा त्यापेक्षा कमी नोटा बाळगणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही. पण त्यापेक्षा अधिक नोटा बाळगणाऱ्यांवर 50 हजार किंवा जप्त करण्यात आलेल्या रकमेच्या पाच पट अधिक रकमेचा दंड ठोठावला जाईल. सीएनएन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार 10 हजार रुपयांपर्यंतच्या जुन्या नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई होणार नाही.
दरम्यान, नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या चलनटंचाईमुळे एटीएम आणि बँकांमधून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली होती. त्यापैकी बँकांमधून रक्कम काढण्याची मर्यादा हटवण्यात येण्याची शक्यता धुसर आहे. मात्र एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत वाढ होऊ शकते.