चारा घोटाळ्याच्या ५०० फायली गायब
By admin | Published: June 9, 2016 05:37 AM2016-06-09T05:37:01+5:302016-06-09T05:37:01+5:30
कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या बिहारच्या पशुसंवर्धन संचालनालयातील किमान ५०० फाइल्स गायब झाल्या आहेत.
पाटणा : कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या बिहारच्या पशुसंवर्धन संचालनालयातील किमान ५०० फाइल्स गायब झाल्या आहेत. या संदर्भात पाटणा येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पशुसंवर्धन संचालनालयातील किमान ५०० फाइल्स गायब झाल्याच्या संदर्भात संचालकांच्या निर्देशानुसार अज्ञात लोकांविरुद्ध गेल्या १६ मे रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात तपास सुरू आहे. भादंविच्या कलम ३७९ अन्वये हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. गायब झालेल्या फाइल्स या चारा घोटाळ्याशी संबंधित असल्याच्या वृत्ताचे राज्याचे पशुसंवर्धनमंत्री अवधेश कुमार सिंग यांनी खंडन केले आहे.
या फाइल्स चारा घोटाळ्याशी संबंधित नाहीत. त्या सेवानिवृत्ती
आणि पेन्शनशी संबंधित आहेत. कारण चारा घोटाळ्याशी संबंधित असलेल्या सर्व फाइल्स आधीच सीबीआयच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. विरोधी पक्ष याबाबत खोटेनाटे आरोप करीत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
>लालूप्रसाद आणि जगन्नाथ मिश्रा हे आरोपी
गेल्या ६ मे रोजी पाटणा येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने १९९४ ते १९९६ दरम्यान भागलपूर आणि बांका जिल्हा कोषागारातून बनावट दस्तऐवजांच्या आधारावर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने फसवणूक आणि पदाचा दुरुपयोग करीत ९५० कोटी रुपये काढण्यात आल्याच्या संदर्भात राजदप्रमुख लालूप्रसाद यादव आणि माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह अन्य ३१ जणांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता, हे येथे उल्लेखनीय आहे.