लांब पल्ल्याच्या 500 रेल्वे गाड्या होणार सुपरफास्ट, प्रवासी वेळेत दोन तासांची होणार कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 08:49 PM2017-10-20T20:49:09+5:302017-10-21T03:16:28+5:30
पुढच्या महिन्यापासून देशात धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणखी सुपरफास्ट होणार आहेत. रेल्वे प्रशासनानं 500 रेल्वे गाड्यांना सुपरफास्ट एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यानं त्यांचा वेग वाढणार आहे.
नवी दिल्ली- पुढच्या महिन्यापासून देशात धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणखी सुपरफास्ट होणार आहेत. रेल्वे प्रशासनानं 500 रेल्वे गाड्यांना सुपरफास्ट एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यानं त्यांचा वेग वाढणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याची आज घोषणा केली आहे. 500 रेल्वे गाड्यांना सुपरफास्ट एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यानं या ट्रेनच्या प्रवासी वेळेत दोन तासांनी कपात होणार आहे.
पुढच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरपासून या सुपरफास्ट एक्स्प्रेसचे वेळपत्रक जाहीर केले जाणार आहे. उशिरानं धावणा-या रेल्वे व वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर अधिकाधिक लक्ष्य केंद्रित करण्याचं ठरवलं आहे. रेल्वे प्रशासनानं ट्रेनचा सर्वाधिक वापर करण्याचा दृष्टिकोन ठेवला असून, त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तसेच पुन्हा परतीच्या प्रवासाला निघणा-या या सुपरफास्ट दर्जाच्या एक्स्प्रेस कोणत्याही स्टेशनवर थांबवणार असल्यास त्या ट्रेनला 'लाय ओव्हर पीरियड'मध्ये थांबवण्याचा रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. नव्या वेळापत्रकानुसार सुरुवातीला 50 रेल्वे गाड्या अशा प्रकारे धावणार आहेत.
रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मंत्रालयाला याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार आता प्रवाशांच्या सोयीसाठी या रेल्वे गाड्यांच्या प्रवासी वेळेत 5 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत कपात करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने अंतर्गत ऑडिट सुरू केले असून, याद्वारे 50 मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना सुपरफास्टचा दर्जा देण्यात येणार आहे. रेल्वेच्या ताफ्यातील सध्याच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सरासरी वेगामध्ये वाढ करण्यात येणार आहे. तसेच या गाड्यांचा स्टेशनात थांबण्याची वेळही कमी करण्यात येणार आहे. तसेच ज्या स्थानकांत कमी प्लॅटफॉर्म आहेत, अशा स्टेशनमध्ये या गाड्या थांबवण्यात येणार नाहीत. रेल्वेतील या नव्या सुधारणांसाठी रेल्वे ट्रॅक आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या गाड्या 130 किमी प्रतितास या वेगाने धावतात. त्यांच्यासाठी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा आणि नव्या बुश कोचची व्यवस्था करण्यात येणार आहे.
अंतर्गत आॅडिट सुरू
रेल्वेगाड्यांचे अंतर्गत आॅडिट केले जात आहे. त्याद्वारे ५० मेल व एक्स्प्रेस गाड्यांना आवश्यक सुधारणा करून सुपर-फास्ट गाड्यांमध्ये परिवर्तित केले जाईल. गाड्यांचा सरासरी वेग वाढविण्याची ही प्रक्रिया आहे. रेल्वे रुळ व पायाभूत बाबींचा विकास, आॅटोमॅटिक सिग्नलिंग व १३० किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकणारे आधुनिक डबे यामुळे रेल्वेगाड्यांचा वेग वाढणे अपेक्षित आहे. आता वेगावरील बंधनावरही पुनर्विचार केला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
या गाड्या लवकर पोहोचतील
भोपाळ-जोधपूर एक्स्प्रेस ९५ मिनिटे आधी पोहोचेल तर, गुवाहाटी-इंदोर स्पेशल ट्रेन २३३० किलोमीटरचा प्रवास ११५ मिनिटांपूर्वी पूर्ण करेल. तसेच, गाझीपूर-बांद्रा टर्मिनन्स एक्स्प्रेस १९२९ किलोमीटरचे अंतर ९५ मिनिटे आधी कापेल. गाड्या वेगवान करण्यासाठी रेल्वेस्थानकावर गाडी थांबविण्याच्या वेळेत कपात करण्यात येईल. तसेच, प्रवाशांची संख्या कमी असलेल्या रेल्वेस्थानकांवर गाडी उभी केली जाणार नाही.