देशामध्ये २0२४ पर्यंत सरकार उभारणार १00 नवी विमानतळे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 03:49 AM2019-11-01T03:49:51+5:302019-11-01T03:50:03+5:30
सध्या मोठे उद्योग व व्यवसाय मोठ्या शहरांत वा त्यांच्या आसपास केंद्रित होत आहेत. तिथे असलेल्या पायाभूत सुविधा हेच त्याचे कारण आहे.
नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सची करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उद्योजक, व्यावसायिक यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी आणि पर्यटनास चालना मिळावी म्हणून सरकारने येत्या पाच वर्षांत देशात १00 नवीन विमानतळे उभारण्याचे ठरविले आहे. याखेरीज देशातील १ हजार शहरांना विमान वाहतुकीने जोडण्यात येणार आहे.
सरकार जे १ हजार हवाई मार्ग सुरू करेल, ते बहुतांशी लहान शहरांना जोडणारे असतील. म्हणजेच लहान शहरांमध्येही विमानसेवा सुरू होईल. या विमानसेवांमुळे लहान शहरांमध्येही व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी गुंतवणूकदार तयार होतील, लहान शहरांत उद्योग, व्यवसाय आल्यास तिथे रोजगारनिर्मिती होईल आणि तेथील अर्थव्यवस्थेलाही गती मिळू शकेल. इतकी विमानतळे व नवे मार्ग सुरू करण्यासाठी विमानांची आणि वैमानिकांची संख्याही वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे २0२४ पर्यंत विमानांची संख्या दुप्पट करून, ती १२00 वर नेण्याचा आणि दरवर्षी ६00 तरुणांना वैमानिकाचे प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत लहान व मध्यम आकाराच्या शहरांतील पायाभूत सुविधांवर तसेच इतर सर्व बाबींवर सविस्तर चर्चा झाली.
सध्या मोठे उद्योग व व्यवसाय मोठ्या शहरांत वा त्यांच्या आसपास केंद्रित होत आहेत. तिथे असलेल्या पायाभूत सुविधा हेच त्याचे कारण आहे. अशा सुविधा लहान व मध्यम आकाराच्या शहरांत देण्यावर बैठकीत एकमत झाले. याशिवाय देशातील कोणत्याही लहान वा मध्यम शहरात अखंड वीज व पाणीपुरवठा तसेच चांगले रस्ते आणि जवळ रेल्वे स्थानके या सुविधा देण्याची तयारी केंद्र सरकारने चालविली आहे.
गुंतवणूकदारांची सोय
ग्रामीण भाग व लहान शहरांत स्वस्त रोजगार, कौशल्य उपलब्धता आणि उत्तम पायाभूत सुविधा यांद्वारे चीनशी स्पर्धा करणे शक्य आहे, असे सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लहान शहरांत जमिनींचे भाव, बांधकाम खर्चही तुलनेने कमी असतो. याचा फायदा गुंतवणूकदारांना मिळू शकतो, असे चीनच्या अनुभवातून दिसून आले आहे. चीनने पुढील १५ वर्षांत ४५0 व्यावसायिक विमानतळे उभारण्याचे ठरविले आहे. तितके इथे करणे लगेच शक्य नसले तरी त्यादृष्टीने तयारी सुरू केली जाणार आहे.