तामिळनाडूतील दारूची ५०० दुकाने होणार बंद
By admin | Published: February 21, 2017 01:27 AM2017-02-21T01:27:34+5:302017-02-21T01:27:34+5:30
राज्य सरकारच्या वतीने चालविली जात असलेली आणखी ५०० किरकोळ दारू विक्रीची दुकाने बंद केल्याची घोषणा मुख्यमंत्री
चेन्नई : राज्य सरकारच्या वतीने चालविली जात असलेली आणखी ५०० किरकोळ दारू विक्रीची दुकाने बंद केल्याची घोषणा मुख्यमंत्री ई. के. पलाणीस्वामी यांनी सुत्रे स्वीकारल्यानंतर घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत केली. या निर्णयामुळे दारूची बंद झालेल्या दुकानांची संख्या एक हजार झाली आहे.
राज्यात टप्प्याटप्प्याने दारुबंदी लागू केली जाईल, असे आश्वासन दिवंगत जयललिता यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. ताजा निर्णय हा त्या आश्वासनाचा भाग आहे, असे पलाणीस्वामी यांनी सांगितले. अण्णाद्रमुकला पुन्हा सत्ता दिल्यास दारूची किरकोळ विक्रीची दुकाने बंद करण्याची घोषणा जयललिता यांनी केली होती. मुख्यमंत्री या नात्याने पलाणीस्वामी यांनी ज्या पहिल्या पाच आदेशांवर स्वाक्षरी केली त्यात ही दारूविक्रीची दुकाने बंद करण्याच्या आदेशाचा समावेश आहे. राज्याला दारुविक्रीतून २६ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो त्यातील ६,३०० कोटी रुपये या किरकोळ दारू विक्रीची दुकाने देतात. याखेरीज गरोदर महिलांना बाळंतपणासाठीच्या खर्चासाठीच्या रकमेत वाढ केली. त्यांनी टू व्हीलर घेतल्यास ५0 टक्के सबसिडी देण्याची योजनाही त्यांनी आजपासून सुरू केली. याशिवाय मच्छिमारांना मोफत घरे आणि बेराजगारांच्या भत्त्यात वाढ या योजनांच्या फायलींवरही त्यांनी सह्या केल्या. (वृत्तसंस्था)
न्यायालयात धाव
तामिळनाडू विधानसभेत शनिवारी संमत झालेला विश्वासदर्शक ठराव हा कायद्याच्या दृष्टीने रद्द ठरवावा, अशी मागणी करणारी याचिका विरोधी पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघमने (द्रमुक) सोमवारी मद्रास उच्च न्यायालयात केली आहे. द्रमुकचे वकील आर. षण्मुगसुंदरम यांनी या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली.