75 वर्षीय नवरदेव, 500 पाहुणे...; नवरीने नकार देताच तो म्हणाला, "गुपचूप येईन, तुला घेऊन जाईन"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 12:38 PM2023-10-27T12:38:14+5:302023-10-27T12:39:09+5:30
वरातीत जास्त माणसं आल्याने नवरी नवरदेवावर रागावली आणि तिने चक्क लग्नास नकार दिला. नवरदेवाला त्यामुळे ती वरात अर्ध्यारस्त्यातूनच परत न्यावी लागली.
उत्तर प्रदेशच्या बांदामधील 75 वर्षांच्या वृद्धाच्या लग्नात नवा ट्विस्ट आला आहे. वरातीत जास्त माणसं आल्याने नवरी नवरदेवावर रागावली आणि तिने चक्क लग्नास नकार दिला. नवरदेवाला त्यामुळे ती वरात अर्ध्यारस्त्यातूनच परत न्यावी लागली. पण लग्नात पाहुणे जास्त असल्याने वधूने लग्नास नकार दिल्याचं जेव्हा समोर आलं तेव्हा आता वृद्धाने नवा निर्णय घेतला आहे.
नवरदेव म्हणतो की, आता तो वर गुपचूप जाईल आणि कोणाला न सांगता नवरीला घेऊन येईल. या लग्नाची बांदामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. हे रंजक प्रकरण नरैनी तहसीलच्या रिसौरा गावातील आहे. रविवार 22 ऑक्टोबर रोजी 75 वर्षीय रामसजीवन यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. मोठ्या धुमधडाक्यात पाहुण्यांच्या उपस्थितीत वरात निघाली.
वरात काढण्यापूर्वी नवरदेवाने फेटा बांधला आणि मंदिरात देवाची पूजा केली. गावातील शेकडो लोक लग्नातील पाहुणे म्हणून हमीरपूरला जात होते. कारण वधू हमीरपूरची आहे. ढोल-ताशांच्या तालावर घरातील व परिसरातील तरुणाई जोमाने नाचली. पण तेवढ्यात अचानक नवरदेवाला एक फोन आला. या कॉलनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.
वधूने नवरदेवाला नकार दिला. त्यानंतर वराला लग्नाची वरात परत नेण्यास भाग पाडण्यात आले. रामसजीवनने सांगितलं की, तो अजूनही वधूशी बोलतो. आमच्या घरी लग्नाला आलेल्या पाहुण्यांची संख्या जास्त असल्याने वधूने लग्नाला नकार दिला होता. वधूने सांगितलं की, ती लग्नात इतक्या मोठ्या पाहुण्यांचे स्वागत करू शकत नाही.
हे ऐकून खूप दुःख झाल्याचे वराने सांगितलं. पण तरीही मी माझ्या वधूशी बोलतो. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. पण यावेळी आम्ही कोणालाही सांगणार नाही. आम्ही रात्रभर फोनवरही बोलत असतो. तिचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की कधी कधी मलाच फोन डिस्कनेक्ट करावा लागतो. कारण ती फोन डिस्कनेक्ट करत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.