आंध्रप्रदेश सरकारची भिका-यांना पाच हजारांची 'भीक'
By admin | Published: July 22, 2015 03:34 PM2015-07-22T15:34:56+5:302015-07-22T15:34:56+5:30
आंध्रप्रदेशमधील राजमुंद्री येथील पुष्करम महोत्सवादरम्यान भिका-यांनी नदीकिनारापासून दुर राहावे यासाठी आंध्र सरकारने भिका-यांसाठी एक भन्नाट योजना राबवली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
राजामुंद्री, दि. २२ - आंध्रप्रदेशमधील राजमुंद्री येथील पुष्करम महोत्सवादरम्यान भिका-यांनी नदीकिनारापासून दुर राहावे यासाठी आंध्र सरकारने भिका-यांसाठी एक भन्नाट योजना राबवली आहे. भिका-यांनी पुष्कर घाटापासून लांब राहावे व या मोबदल्यात नुकसान भरपाई म्हणून तब्बल पाच हजार रुपयांची भरपाई देण्याची घोषणा आंध्र सरकारने केली आहे.
राजमुंद्री येथे सध्या पुष्करम महोत्सव सुरु असून दक्षिणेतील कुंभ मेळा म्हणून या उत्सवाला ओळखले जाते. या उत्सवात लाखो भाविक गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी येतात. आंध्र सरकारने या महोत्सवासाठी जय्यत तयार केली असून या उत्सवासाठी तब्बल १७ घाट तयार करण्यात आले आहे. १४ जुलैपासून हा उत्सव सुरु झाला आहे. या महोत्सवादरम्यान अनेक भिकारीही नदी किनारी जमतात व भीक मागतात. भिका-यांनी या महोत्सवापासून लांब राहावे यासाठी आंध्र सरकारने नवीन शक्कल लढवली आहे. यानुसार प्रत्येक भिका-याला ५ हजार रुपये दिले जातील पण या मोबदल्यात त्या भिका-याने महोत्सवाला जायचे नाही ही प्रमुख अट आहे. याशिवाय भिका-यांना मोफत जेवणही दिले जाईल असे अधिका-यांनी म्हटले आहे. ज्या भिका-यांकडे रेशनकार्ड नाही, जे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नाही अशा भिका-यांसाठीच ही योजना लागू आहे. मात्र अनेक स्थानिकही या योजनेचा लाभ घेण्यासाठी भिकारी बनून पुढे येत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यावरही आंध्र सरकारने तोडगा काढला असून भिका-यांच्या बोटांचे ठसे घेऊन त्याची तपासणी केली जाणार आहे. सर्व भिका-यांना सखोल तपासणीनंतरच या योजनेचा लाभ घेता येईल अशी माहिती एका अधिका-याने दिली.