5000 भारतीयांना "अॅमेझॉन" देणार नोक-या
By admin | Published: May 3, 2017 04:00 PM2017-05-03T16:00:20+5:302017-05-03T16:00:20+5:30
ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी असलेल्या अॅमेझॉननं आता भारतात हातपाय पसरण्यासाठी पाऊल उचललं आहे.
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 3 - ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी असलेल्या अॅमेझॉननं आता भारतात हातपाय पसरण्यासाठी पाऊल उचललं आहे. अॅमेझॉन भारतात जवळपास पाच हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती बिझनेस स्टँडर्डनं दिली आहे. अॅमेझॉन या कंपनीनं ग्राहकांना वस्तू लवकरात लवकर घरपोच मिळाव्यात, यासाठी गोदामांच्या संख्येत वाढ करण्याची तयारी दर्शवली आहे.
कंपनीचा 14 नवी गोदामे आणि सेवा केंद्रे सुरू करण्याचा विचार आहे. यामुळे कंपनीच्या वस्तू साठवून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होऊन अनेकांना नोक-या मिळणार आहेत, असे कंपनीचे म्हणणे आहे. वाढीव गोदामांमुळे कंपनीच्या ग्राहकांना अधिक जलद सेवा मिळण्याची शक्यता आहे. तसेच विक्रेत्यांनाही स्वतःची विविध उत्पादने विकता येणार आहेत. अॅमेझॉनकडून सण-उत्सवांच्या वेळी अतिरिक्त मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे. मात्र या केंद्रांवरील रोजगारनिर्मिती ही स्वतंत्रपणे राबवली जाणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. अॅमेझॉन इंडियाच्या कस्टमर फुलफिलमेंट विभागाचे अध्यक्ष अखिल सक्सेना यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, "आम्ही गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने भारतात आमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहोत. या वाढीव केंद्र आणि गोदामांमुळे आमच्या ग्राहकांना जलद वेगाने सेवा देणे शक्य होणार आहे. यंदा सुरू होणाऱ्या सात गोदामांमध्ये मोठं सामान आणि फर्निचर ठेवण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच इतर तीन केंद्रांमार्फत कंपनी आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यांतदेखील विस्तार करू पाहत आहे. एकंदरीत या केंद्रांसाठी नेमकी किती गुंतवणूक केली जाणार आहे, याबाबत कंपनीनं अजूनही काहीही वाच्यता केलेली नाही.