मुद्रा योजनेअंतर्गत ५० हजार कोटींचे कर्ज वाटप
By admin | Published: December 30, 2015 01:44 AM2015-12-30T01:44:13+5:302015-12-30T01:44:13+5:30
मुद्रा योजनेअंतर्गत बँकांनी लघु उद्योजकांना आतापर्यंत ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली. तुम्ही नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे व्हा
नवी दिल्ली : मुद्रा योजनेअंतर्गत बँकांनी लघु उद्योजकांना आतापर्यंत ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली. तुम्ही नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे व्हा असे आवाहनही त्यांनी केले.
अनुसूचित जाती, जमातीतील उद्योजकांच्या एका राष्ट्रीय परिषदेत बोलताना मोदी म्हणाले की, ८० हजार जणांचा पीएमएमवाय अर्थात प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ मिळालेला आहे. त्यांना ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात आले आहे. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसीमधील लाभार्थ्यांचा समावेश आहे. या माध्यमातून १४ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले.
मोदी म्हणाले की, अनुसूचित जाती- जमातीच्या या संघटनेला सरकार आवश्यक हवे ते सहकार्य करेल. या संघटनेचा प्रगतीचा वेग आगामी दोन वर्षात दुपटीने वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हे शक्य आहे, कारण केंद्रात तुमचे हक्काचे सरकार आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पाच उद्योजकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सामाजिक न्याय विभागाचे मंत्री गेहलोत म्हणाले की, मागील वर्षी १.५ लाख लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे मिलिंद कांबळे म्हणाले की, संघटना दलित उद्योजकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार तर होतेच; पण ते एक अर्थतज्ज्ञही होते, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून उपेक्षित समाजातील गरजूंना नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील.
अनुसूचित जाती, जमातीतील उद्योजकांसाठी २०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. हे सरकार आपले सर्वांचेच सरकार आहे आणि सर्वांच्या सशक्तीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.