नमोपर्व 2.0 : मोदींच्या कॅबिनेटमधील 91 टक्के मंत्री करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 08:43 AM2019-06-01T08:43:51+5:302019-06-01T08:58:26+5:30

मोदींच्या कॅबिनेटमधील 56 मंत्र्यांपैकी 51 मंत्री हे करोडपती आहे. तर 22 जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती आता समोर आली आहे.

51 Of 56 Union Ministers In New Central Government Are Crorepatis | नमोपर्व 2.0 : मोदींच्या कॅबिनेटमधील 91 टक्के मंत्री करोडपती

नमोपर्व 2.0 : मोदींच्या कॅबिनेटमधील 91 टक्के मंत्री करोडपती

googlenewsNext
ठळक मुद्देमोदींच्या कॅबिनेटमधील 56 मंत्र्यांपैकी 51 मंत्री हे करोडपती आहे. 22 जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती आता समोर आली आहे.असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे. हरसिमरत कौर बादल या सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. 

नवी दिल्ली - देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली आणि 'नमोपर्व 2.0' ची सुरुवात झाली. मंत्रिमंडळाचा गुरुवारी शपथविधी पार पडल्यानंतर लगेचच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्यांचे वाटप केले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच देण्यात आले आहे. मोदींच्या कॅबिनेटमधील 56 मंत्र्यांपैकी 51 मंत्री हे करोडपती आहे. तर 22 जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती आता समोर आली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे. 

एडीआर या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा आणि राज्यसभा यातील सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक मंत्र्यांकडे जवळपास 14.72 कोटींची संपत्ती आहे. तर गृहमंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि अकाली दलाच्या हरसिमरत कौरबादल यांच्यासह चार मंत्र्याकडे 40 कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांची सून आणि अकाली दल प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल या सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. 

हरसिमरत कौर बादल यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची एकूण संपत्ती 217 कोटी रुपये आहे. 56 मंत्र्यापैकी 22 मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यातील 16 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने दिली आहे. तर आठ मंत्र्यांनी दहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलं असून 47 मंत्री हे पदवीधर आहेत. शपथविधी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 24 कॅबिनेट, नऊ राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) आणि 24 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. 

सतराव्या लोकसभेमध्ये 475 खासदार करोडपती

नव्या लोकसभेमध्ये निवडून आलेल्यांपैकी 475 खासदार करोडपती आहेत. त्यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ सर्वात श्रीमंत खासदार आहेत. त्यांच्याकडे 660 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ही माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने दिली आहे.

599 नव्या खासदारांच्या संपत्ती व इतर बाबींसंदर्भात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करून एडीआरने हा निष्कर्ष काढला आहे. यंदा लोकसभेत 542 खासदार निवडून आले आहेत. मात्र त्यातील भाजपचे दोन व काँग्रेसच्या एका खासदाराचे निवडणूक आयोगाला सादर केलेले प्रतिज्ञापत्र एडीआरला उपलब्ध होऊ शकले नाही. नव्याने निवडून आलेल्या भाजप खासदारांपैकी 301 जणांची प्रतिज्ञापत्रे एडीआरने तपासली. त्यातील 88 टक्के म्हणजे 265 खासदार करोडपती असल्याचे आढळून आले. भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनेचे सर्व 18  खासदार कोट्याधीश आहेत. काँग्रेसच्या 51 खासदारांपैकी 43 खासदार, द्रमुकच्या 23 खासदारांपैकी 22, तृणमूल काँग्रेसच्या 22  खासदारांपैकी 20, वायएसआर काँग्रेसच्या 22 खासदारांपैकी 19 खासदार करोडपती असल्याचे एडीआरने म्हटले आहे.

 

Web Title: 51 Of 56 Union Ministers In New Central Government Are Crorepatis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.