माल्ल्या, नीरव मोदींसह 51 जण फरार; देशाला 17,900 कोटींचा चुना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 01:22 PM2019-12-04T13:22:00+5:302019-12-04T13:24:01+5:30
अर्थ राज्यमंत्र्यांची राज्यसभेत महत्त्वपूर्ण माहिती
मुंबई: विजय माल्ल्या, नीरव मोदी बँकांची फसवणूक करुन देश सोडून फरार झाल्यानं मोदी सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली. मात्र नीरव मोदी, विजय माल्ल्या हे दोनच उद्योगपती देश सोडून गेलेले नाहीत. देशातील एकूण ५१ जण बँकांना चुना लावून फरार झाल्याची माहिती मोदी सरकारकडून संसदेत देण्यात आली आहे. देशाबाहेर पळून गेलेल्या ५१ जणांनी १७,९०० कोटींची फसवणूक केली आहे.
अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत केंद्रीय तपास यंत्रणेच्या अहवालाचा संदर्भ देत देश सोडून पळून गेलेल्यांची माहिती दिली. फसवणुकीच्या ६६ प्रकरणांमध्ये ५१ फरार असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. देश सोडून परांगदा झालेल्या आरोपींनी एकूण १७,९४७.११ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणांमध्ये अंमलबजावणी संचलनालय आणि सीबीआयनं न्यायालयांमध्ये आरोपपत्रं दाखल केली असून तपास सुरू असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.
देश सोडून पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्यासाठी सीबीआयचे प्रयत्न सुरू आहेत. केंदीय अप्रत्यक्ष कर विभाग आणि सीमा शुल्क विभागानं आर्थिक अपहार करुन पळून गेलेल्या सहा आरोपींबद्दलचा अहवाल दिला असल्याचं ते म्हणाले. अंमलबजावणी संचलनालयानं १० आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केली असून त्यापैकी आठ आरोपींविरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीसदेधील जारी केल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.