CoronaVirus News: कृतज्ञता! दिल्ली पोलिसांतील ५१ बाइकस्वारांनी एम्स रुग्णालयाला घातली प्रदक्षिणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 04:03 AM2020-05-01T04:03:18+5:302020-05-01T04:03:36+5:30
यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, कोरोनाशी लढा देणारे डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचारी हे खरे हिरो आहेत.
नवी दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात रुग्णांची अहोरात्र सेवा करणारे डॉक्टर, परिचारिका व अन्य वैद्यकीय कर्मचारी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिल्ली पोलिसांतील ५१ बाइकस्वारांच्या एका पथकाने येथील आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) इमारतीला बुधवारी प्रदक्षिणा घातली. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, कोरोनाशी लढा देणारे डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचारी हे खरे हिरो आहेत. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता एम्स रुग्णालयाच्या इमारतीला पोलीस दलातील ५१ बाइकस्वारांनी प्रदक्षिणा घातली. पोलिसांच्या या पथकामध्ये महिला पोलिसांचाही समावेश होता. दक्षिण दिल्लीतील पोलीस उपायुक्त अतुलकुमार ठाकूर यांनी सांगितले की, देशातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी झटणाऱ्या डॉक्टरांच्या कार्याला सलाम करण्याची दिल्ली पोलिसांना इच्छा होती. त्यामुळे हा उपक्रम हाती घेण्यात आला. सध्या दिल्ली पोलीस शहरातील प्रत्येक रुग्णालयात जाऊन तेथील डॉक्टरांची भेट घेत आहेत. ते करत असलेल्या रुग्णसेवेसाठी पोलीस आभार मानतात. दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर, कर्मचारी यांची दिल्ली पोलिसांनी बुधवारी भेट घेतली. कोणतीही मदत करण्यास आम्ही सज्ज आहोत असे पोलिसांनी या डॉक्टरांना सांगितले. कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असताना त्यांच्या नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटना देशात काही ठिकाणी घडल्या आहेत. त्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. अशा वेळी डॉक्टरांवर हल्ले होऊ देणार नाही यासाठी पोलीस सतर्क आहेत व हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा संदेश देण्यासाठीही दिल्ली पोलिसांनी सध्या काही उपक्रम हाती घेतले आहेत.