५१ घाट, २४ लाख दिवे; अयोध्येत भव्य दीपोत्सव, नवा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यास रामनगरी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 10:28 AM2023-11-10T10:28:23+5:302023-11-10T10:31:27+5:30

Ayodhya Deepotsav 2023: अयोध्येतील यंदाचा दीपोत्सव अनेकार्थाने विशेष आणि खास ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

51 ghats 24 lakh lamp grand deepotsav in ayodhya ramnagari ready to set a new world record in 2023 | ५१ घाट, २४ लाख दिवे; अयोध्येत भव्य दीपोत्सव, नवा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यास रामनगरी सज्ज

५१ घाट, २४ लाख दिवे; अयोध्येत भव्य दीपोत्सव, नवा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यास रामनगरी सज्ज

Ayodhya Deepotsav 2023: देशभरात दिवाळी पर्वाला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशातीलअयोध्या नगरीत भव्य दीपोत्सवाचे आयोजन केले जात आहे. या भव्य दीपोत्सवासाठी शरयू नदीवरील ५१ घाट सज्ज झाले आहेत. यंदाच्या वर्षी या दीपोत्सवात २४ लाख दिवे उजळवले जाणार आहेत. हा एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. दिवाळीनिमित्त संपूर्ण शहराची सजावट करण्यात आली आहे. लेझर शोचीही तयारी सुरू आहे. लेझर शोच्या माध्यमातून प्रभू श्रीराम चरित्राची झलक दाखवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार दीपोत्सवाची सर्व तयारी करण्यात येत आहे. दीपोत्सवात २५ हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले असून, पुन्हा एकदा विश्वविक्रम करणार आहेत. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत बहुतांश दिवे स्वयंसेवकांनी सर्वच घाटांवर सज्ज केले. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा सातवा दीपोत्सव आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या दीपोत्सवात भारत कुंड, गुप्तार घाट, बिर्ला धर्मशाळा, रामघाट, रामकथा पार्कमध्ये भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. 

यंदाचा दीपोत्सव अनेक अर्थांनी खास ठरणार

दीपोत्सवादरम्यान शरयू नदीच्या काठावरील लेझर शो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून, त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. शरयू नदीच्या काठावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शरयू नदीचा किनारा अतिशय सुंदररित्या सजवण्यात आला आहे. यंदाचा दीपोत्सव अनेकार्थांनी खास ठरणार असल्याचे बोलले जात आहे. केवळ जागतिक विक्रमच नाही तर अधिकाधिक लोकांना जोडण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. दीपोत्सवात परदेशी कलाकार रामलीला कार्यक्रमात सहभागी होणार असून, त्यात रशिया, श्रीलंका, सिंगापूर आणि नेपाळमधील कलाकार भाग घेणार आहेत. देशातील २१ राज्यांतील रामलीला आणि रामायण परंपरेवर आधारित लोक सादरीकरण केले जाणार आहे. यासाठी सुमारे अडीच हजार कलाकार अयोध्येत पोहोचले आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दीपोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. परंतु, कार्यक्रमांच्या व्यस्ततेमुळे त्या उपस्थित राहू शकणार नाहीत. अयोध्येत भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराचे बांधकाम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून, त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
 

Web Title: 51 ghats 24 lakh lamp grand deepotsav in ayodhya ramnagari ready to set a new world record in 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.