५१% भारतीय महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 04:28 AM2017-11-08T04:28:43+5:302017-11-08T04:29:04+5:30
भारतातील ५१ टक्के महिलांमध्ये रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे, तर अनेक महिला लठ्ठपणाशी निगडित रोगांचा सामना करत असल्याचेही दिसून आले आहे
नवी दिल्ली : भारतातील ५१ टक्के महिलांमध्ये रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे, तर अनेक महिला लठ्ठपणाशी निगडित रोगांचा सामना करत असल्याचेही दिसून आले आहे. ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट २०१७ मधून ही माहिती समोर आली आहे.
भारतातील अर्ध्याहून अधिक महिला अॅनेमियाशी (अशक्तपणा) झगडत आहेत, तर २२ टक्के वयस्क महिलांचे वजन अधिक आहे. हिमोग्लोबिन व रक्ताची कमतरता असणाºया देशांत भारताखालोखाल चीन, पाकिस्तान, नायजेरिया आणि इंडोनेशिया आहेत.
जगातील १४० देशातील स्थितीचे यात विश्लेषण करण्यात आले आहे. काही सरकारांनी ही समस्या ओळखण्यास सुरुवात केली आहे, पण भारताने याबाबत काही प्रगती केली नाही. विशेषत: भारतात आई बनण्याच्या वयात महिलांमध्ये रक्ताची कमतरता दिसून येते. २०१६ मध्ये अहवालातून स्पष्ट झाले होते की, ४८ टक्के महिलांमध्ये रक्ताची कमतरता आहे.
डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, भारतात अॅनेमियाच्या कारणामागे के वळ पोषण हे कारण नाही, तर स्वच्छतेकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष हेही कारण आहे. प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. इंदू तनेजा यांचे म्हणणे आहे की, प्रजननाच्या वयात अॅनेमिया महिला आणि मुलांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण करतो.