नारायण राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला 51 लाखांचं बक्षीस, विश्व हिंदू सेनेच्या अध्यक्षाचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 09:38 PM2021-08-26T21:38:02+5:302021-08-26T21:57:32+5:30
Narayan Rane: अरुण पाठक सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
वाराणसी: विश्व हिंदू सेनेचा अध्यक्ष अरुण पाठक याने पुन्हा एकदा सोशल मीडियावरुन वादग्रस्त विधान केलं आहे. वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वादग्रस्त पोस्टर्स चिकटवल्याप्रकरणी तीन महिन्यांपासून फरार असलेल्या पाठकनं ट्विटरवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 51 लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
'काशीमध्ये अस्थी विसर्जन होऊ देणार नाही'
अरुण पाठक भेलूपूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यात वॉन्टेड आहे, पण अद्याप पोलीस त्याचा शोध घेऊ शकले नाहीत. अरुण पाठकनं ट्विटरवर लिहिलं की, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना बाळासाहेबांनी मोठं केलं आणि आता ते त्यांच्या मुलाविरोधात बोलत आहेत. राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला 51 लाखांचं बक्षीस दिलं जाईल. तसेच, नारायण राणेंच्या अस्थी काशीमध्ये विसर्जित होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले.
वादाशी जुनं नातं
अरुण पाठकनं 2020 मध्ये नेपाळी तरुणाचं मुंडन करुन जयश्री रामच्या घोषणा दिल्या होत्या. त्या प्रकरणी भेलूपूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तीन महिन्यांपूर्वी अरुण पाठकने कॅन्ट, सिग्रा, लंका, दुर्गाकुंड परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे वादग्रस्त पोस्टर्सही लावले होते. या प्रकरणी लंकेच्या भेलूपूरसह सिग्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पण, पाठक सध्या फरार आहे.