मतदान न केल्यास 51 रुपयांचा दंड; गुजरातमधील गावात प्रचारावर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 07:53 AM2019-04-21T07:53:14+5:302019-04-21T07:53:38+5:30
गुजरातमध्ये राजसमाधीयाला या नावाचे एक गाव आहे. या गावात कमालीची स्वच्छता केली जाते.
बडोदा : गुजरातमधील एका गावात कोणत्याही निवडणुकीत मतदान न केल्यास मतदाराला चक्क 51 रुपयांचा दंड आकारण्यात येतो. तर राजकीय पक्षांच्या प्रचारालाही या गावामध्ये बंदी घालण्यात आली आहे. या बद्दल दोन्ही पक्षांना निम्मी निम्मी मते घालण्याची शक्कल या गावकऱ्यांनी शोधली आहे.
गुजरातमध्ये राजसमाधीयाला या नावाचे एक गाव आहे. या गावात कमालीची स्वच्छता केली जाते. हरदेव सिंह जडेजा हे जेव्हा सरपंच झाले होते, तेव्हापासून या गावामध्ये निवडणुकांचा प्रचार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याचे कारण गावकऱ्यांनी असे सांगितले की, प्रचारामुळे प्रदुषण होते. तसेच मतदानही सक्तीचे करण्यात आले आहे. मतदान न केल्यास त्या व्यक्तीला 51 रुपयांचा दंड भरावा लागतो. प्रचार करायलाच जर कोणी आला नाही, मग मत कोणाला देणार? तर यावरही गावकऱ्यांनी उपाय शोधून ठेवला आहे.
दोन पक्षांचे उमेदवार जर निवडणुकीला उभे असतील तर गावातील एकूण मतांपैकी निम्मी मते एकाला तर निम्मी मते दुसऱ्या उमेदवाराला घालण्यात येतात.
Ashok Bhai Vaghera: There is a fine of Rs 51 on those who don't vote. Every time our efforts are to ensure 100% voting. But voter list also contains names of those who have died. Girls often leave after marriage but their names remain in voter's list. But we reach around 95-96% pic.twitter.com/tPJN4OiSdO
— ANI (@ANI) April 20, 2019
महत्वाचे म्हणजे या गावाने आपली एक आदर्श नियमावलीच जारी केली आहे. जातीयवादाला या गावात थारा नाही. 18 वर्षे पूर्ण झालेल्यांनी रिकामे बसायचे नाही. प्राथमिक शिक्षण सक्तीचे, अशा काही नियमांबरोबरच काही चुका केल्यास दंडही आकारण्याच येतो. यापैकीच एक म्हणजे मतदान न केल्यास 51 रुपयांचा दंड. दंडाची रक्कम 51 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहे.
- उघड्यावर, गावात कचरा टाकल्यास 51 रुपयांचा दंड
- प्लॅस्टिक पिशव्या फेकल्यास 51 रुपयांचा दंड
- गुटखा खाल्ल्यास 51 रुपयांचा दंड
- मद्यप्राशन 500 रुपयांचा दंड
- खोटा साक्षीदार बनल्यास 251 रुपये दंड
- ग्राम पंचायतीचा कर थकवल्यास, अतिक्रमण केल्यास, सार्वजनिक ठिकाणी एखाद्यावर टीका केल्यास 251 रुपयांचा दंड
- झाडांना हानी किंवा तोडल्यास 500 रुपयांचा दंड
- लोक अदालतीला न विचारता पोलिसांत किंवा न्यायालयात गेल्यास 500 रुपयांचा दंड
- फटाक्यांचा वापर किंवा अंधश्रद्धा बाळगल्यास 500 रुपयांचा दंड आकारण्यात येतो.