देवभूमीत महाप्रलय; २४ तासांत ५२ बळी, शिमल्यात मंदिरावर दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 05:19 AM2023-08-15T05:19:12+5:302023-08-15T05:23:47+5:30
रेल्वेरूळ उखडले, घरांचेही नुकसान
शिमला : मुसळधार पाऊस हिमाचल प्रदेशचा पिच्छा सोडायला तयार नाही. दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत भूस्खलन, ढगफुटी आणि पावसाच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ५२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. शिमल्याच्या समरहिल भागात असलेल्या शिव बावडी मंदिरावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. रात्री उशिरापर्यंत ११ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी १५ ते २० जण अडकले असण्याची भीती आहे. त्यांचा शोध सुरु आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. डोंगरावरून अजूनही दरडी कोसळत आहेत. ढिगाऱ्यासह मंदिरावर चार ते पाच झाडे उन्मळून पडली. एसडीआरएफ, आयटीबीपी, पोलिस आणि स्थानिक लोक बचावकार्यात गुंतले आहेत. जेसीबी मशीनने मलबा काढला जात आहे.
गेले काही दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातीलशिमलामध्ये असलेला शिमला-कालका रेल्वेमार्गालगत अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. अनेक ठिकाणी रुळाखाली असलेली माती वाहून गेली आहे. त्यामुळे रेल्वेरुळ अक्षरश: हवेत तरंगताना दिसत आहेत. हिमाचल प्रदेशात मंडीमध्ये झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये १९ जणांचा तर शिमल्यामध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे. सिरमौरमध्ये ४ जण मृत्युमुखी पडले आहेत. मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. राज्यात दोन दिवस जोरदार पावसाचा अलर्ट आहे.
लक्ष्मणझुला : पाच जण बेपत्ता
उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील लक्ष्मणझुला भागात सोमवारी भूस्खलन झाल्याने चार ते पाच जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे एका रिसॉर्टवर दरडी कोसळल्या आणि त्याखाली चार-पाच लोक अडकले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चारधाम यात्रा दोन दिवस लांबणीवर
राज्यातील मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोमवारी दिली.
सोलनमध्ये ढगफुटी
- सोलनमजवळील दोन गावांत ढगफुटीमुळे एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत दोन घरे वाहून गेली असून, यामध्ये ३ जण बेपत्ता असल्याचेही वृत्त आहे.
- मंडी जिल्ह्यातील बलह खोऱ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. व्यास नदीला पूर आला आहे. अनेक पर्यटक येथे अडकून पडले आहेत.
- मंडी येथे पावसामुळे भूस्खलनात ६ जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर ट्रक, बस आणि मोठमोठी वाहने ढिगाऱ्याखाली दबली आहेत. फागली येथेही दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. सिरमौरमध्ये ४, हमीरपूर, कांगडा आणि चंबामध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.