७५ वर्षांत ५३ भारतरत्न, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनाही सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 08:26 AM2024-02-11T08:26:11+5:302024-02-11T08:26:26+5:30
व्ही. पी. सिंग यांनी त्यांच्या एका वर्षाच्या कार्यकाळात दोघांना भारतरत्न दिले. पी. व्ही. नरसिंह राव यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सहा जणांना भारतरत्न दिले.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या १७ वर्षांच्या कार्यकाळात १३ मान्यवरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. त्यांची कन्या इंदिरा गांधी यांनी १६ वर्षांच्या कार्यकाळात केवळ ६ भारतरत्न पुरस्कार दिले. त्यांचे पुत्र राजीव गांधी यांनी केवळ दोन नामवंतांना भारतरत्न दिले. ७५ वर्षांत ५३ मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे.
व्ही. पी. सिंग यांनी त्यांच्या एका वर्षाच्या कार्यकाळात दोघांना भारतरत्न दिले. पी. व्ही. नरसिंह राव यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सहा जणांना भारतरत्न दिले. अटलबिहारी वाजपेयी हे उदारमतवादी राहिले. त्यांनी त्यांच्या एकूण सहा वर्षांच्या कार्यकाळात आठ व्यक्तींना हा पुरस्कार दिला. मनमोहन सिंग यांनी दहा वर्षांच्या कार्यकाळात केवळ ३ जणांना तर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दहा वर्षांच्या सत्तेत आतापर्यंत दहा जणांना भारतरत्न दिले आहेत.
इंदिरा गांधी यांनी १९७६ मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. कामराज यांना भारतरत्न पुरस्कार दिला. राजीव गांधी यांनी दक्षिणेत काँग्रेसला मजबूत करण्याचा प्रयत्न केला आणि एआयएडीएमकेची स्थापना करणाऱ्या एम. जी. रामचंद्रन यांना भारतरत्न दिला.
पी. व्ही. नरसिंह राव हे चतुर राजकारणी होते. त्यांनी राजीव गांधी यांना पुरस्कार दिलाच, पण तर इंदिरा गांधी यांना तुरुंगात पाठविणाऱ्या मोरारजी देसाई यांना हा पुरस्कार दिला. त्यांनी सरदार पटेल यांनाही भारतरत्नही दिला. भारतरत्न देताना वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांनी निवडणुकीचे राजकारण दूर ठेवले.