मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 08:58 AM2024-09-27T08:58:41+5:302024-09-27T08:58:48+5:30
सीडीएससीओ चाचणीतील धक्कादायक निष्कर्ष; अनेक नामांकित कंपन्यांच्या औषधांचा समावेश; कंपन्या म्हणतात ती औषधे आमची नाहीतच
नवी दिल्ली : पॅराॅसिटॅमॉल, पॅन डी, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी ३ सप्लिमेंट्स, मधुमेह, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ही निकृष्ट दर्जाची असल्याचे सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे.
अल्केम लॅबोरेटरीज, हिंदुस्तान ॲण्टिबायोटिक्स लिमिटेड, हेटेरो लॅब्ज लिमिटेड, कर्नाटक ॲण्टिबायोटिक्स ॲण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड, नेस्टर फार्मास्युटिकल्स लिमिटेड, प्रिया फार्मास्युटिकल्स, स्कॉट-एडिल फार्मासिया लि. आदी कंपन्यांनी बनविलेल्या काही औषधांबाबत सीडीस्कोने ऑगस्टच्या ड्रग अलर्टमध्ये हे निरीक्षण नोंदविले आहे. या औषधांच्या नमुन्यांची सीडीस्कोने तपासणी केली होती. शेल्कल, व्हिटॅमिन सी (सॉफ्टजेल्ससह), व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी आणि डी ३ गोळ्या, सिप्रोफ्लोक्सासिन यासारखी औषधे दर्जानुसार बनविली नव्हती, तसेच ती विघटन चाचणीमध्ये अयशस्वी ठरल्याचे दिसून आले.
गुजरात, गोवा, बिहारसह अनेक राज्यांनी माहितीच दिली नाही
सीडीस्कोने सांगितले की, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मणिपूर, राजस्थान, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, पंजाब, सिक्कीम आणि तामिळनाडूच्या औषधे परवाना प्राधिकरणांनी ऑगस्ट २०२४ साठी नॉट ऑफ स्टॅण्डर्ड क्वालिटी (एसएसक्यू) अलर्ट संबंधित कोणताही तपशील सादर केलेला नाही.
पुडुचेरी, पाॅण्डेचेरी, तेलंगणा, दिल्ली, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार, दादरा आणि नगरहवेली, दमण आणि दीव आणि लक्षद्वीप यांनीही ही माहिती सादर केलेली नाही.
कंपन्या म्हणतात...
सीडीस्कोने निकृष्ट दर्जाच्या ठरवलेल्या ५३ औषधांमध्ये आम्ही उत्पादित केलेले एकही औषध नाही, असे सन फार्मा आणि टोरेंट फार्मा यासहित काही औषध कंपन्यांनी स्पष्ट केले.
आम्ही गुणवत्ता व दर्जाशी तडजोड न करता औषधांचे उत्पादन करतो. आमच्या औषधांवर क्यूआर कोड आहेत. त्यांचे स्कॅनिंग करून लोकांना औषधाबाबतची सत्यस्थिती जाणून घेता येते, असेही या औषध कंपन्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने काय कारवाई केली? अखिलेश यादव यांचा सवाल
सीडीस्कोने निकृष्ट ठरविलेल्या ५३ औषधांबाबत केंद्र सरकारने काय कारवाई केली असा सवाल समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी गुरुवारी विचारला आहे.
निकृष्ट दर्जाची ही औषधे घेऊन लोक बरे होणार की आणखी आजारी पडणार, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे, असेही यादव टीका करताना म्हणाले.