५३ वर्षांची आई मुलींसह झाली बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण; घरातील आनंद तिपटीने वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 08:11 AM2022-07-08T08:11:39+5:302022-07-08T08:11:55+5:30
त्रिपुरातील शीला राणी दास यांचे खूप कमी वयात लग्न झाले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या पतीचे निधन झाले.
आगरतळा : आई व तिच्या दोन मुली एकाच वेळी त्रिपुरा माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याची अनोखी घटना घडली आहे. या शिक्षण मंडळाने यंदाच्या १० वी व १२ वी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर केला. त्यात शीला राणी दास (५३ वर्षे) या १० वी व त्यांच्या दोन मुली १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्यांच्या घरातील आनंद तिपटीने वाढला.
त्रिपुरातील शीला राणी दास यांचे खूप कमी वयात लग्न झाले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर घर चालविण्यासाठी व दोन मुलींचे पालनपोषण करताना त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. शीला यांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. मात्र त्यांना अनेक कारणांनी शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. मुली मोठ्या झाल्या तसे त्यांनी आपल्या आईला आग्रह केला की, तू दहावीची परीक्षा दिलीच पाहिजे. शीला यांच्या मनातही ती इच्छा होतीच. मुलींबरोबर शीला राणी दास यादेखील परीक्षेचा अभ्यास करू लागल्या. अभ्यासात काही अडले की मुली आपल्या आईला तो मुद्दा नीट समजावून सांगत.
शीला राणी दास यांनी सांगितले की, पन्नाशी उलटल्यानंतरही मी दहावीची परीक्षा देत असताना मुली किंवा ओळखीच्या लोकांनी मला
प्रोत्साहनच दिले. त्यामुळेच मी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. शीला या आगरतळा येथील अभयनगर स्मृती विद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या.
मुलींनी अभ्यासात केली आईला मदत
शीला राणी दास यांची मुलगी जयश्री यंदा १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाली. तिने आईच्या यशाबद्दल सांगितले की, आई १० वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली याचा आम्ही सर्वांनाच आनंद झाला आहे. तिला आम्ही अभ्यासात मदत केली. आईला मुळात शिक्षणाची आवड आहे. त्यामुळे तिने जिद्दीने ही परीक्षा देऊन त्यात यश मिळविले.