इंदिरा गांधी विमानतळावर ५३२ किलो सोने जप्त
By Admin | Published: March 13, 2016 10:51 PM2016-03-13T22:51:12+5:302016-03-13T22:51:12+5:30
येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षभरात १३० कोटींचे ५३२ किलो सोने जप्त करून सोने तस्करी करणाऱ्या २१८ आरोपींना अटक करण्यात आली.
नवी दिल्ली : येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षभरात १३० कोटींचे ५३२ किलो सोने जप्त करून सोने तस्करी करणाऱ्या २१८ आरोपींना अटक करण्यात आली. अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त विनायक आझाद यांनी ही माहिती दिली.
अलीकडे सोने तस्करीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दुबई, अबुधाबी, बँकॉक, सिंगापूर आणि नेपाळहून येणाऱ्या प्रवाशांवर अबकारी खात्याचे अधिकारी खास करून नजर ठेवून असतात. बेल्ट, बॅग, ट्रॉलीत सोने लपवून आणले जाते. अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटण्यासाठी सोने तस्कर नवविवाहित जोडपे आणि गरीब युवकांची मदत घेतात.
अनेकदा विमानतळ कर्मचाऱ्यांचाही सोने तस्करीसाठी वापर केला जातो; मात्र अधिकाऱ्यांची सावध नजर आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे २०१५ मध्ये सोने तस्करीचे ३७० गुन्हे दाखल करण्यात आले. २१८ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ५३२ किलो सोने जप्त करण्यात आले. बाजारपेठेत या सोन्याची किंमत १३०. १ कोटी रुपये आहे, असेही आझाद यांनी सांगितले.
तीन वर्षांत अबकारी खात्याने सोने तस्करीशी संबंधित प्रकरणात बजावलेली कामगिरी पुढीलप्रमाणे आहे.
वर्ष ——- गुन्हे —— आरोपी — सोने ——— किंमत
२०१३ — ३६३ ——- १२३ — ३५३ किलो — ०९२ कोटी
२०१४ — ३८८ ———२३० —- ५९६ किलो — १५५ कोटी
२०१५ — ३७० ——- २१८ —— ५३२ किलो — १३०.१ कोटी
—-