मोदींच्या ७७ पैकी ५४ मंत्र्यांनी मालमत्तेचा तपशीलच दिला नाही, जेटली सर्वाधिक श्रीमंत, पासवानांकडे सर्वांत कमी संपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 04:16 AM2017-10-16T04:16:23+5:302017-10-16T04:16:59+5:30
३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत आपल्या मालमत्तांचा तपशील सादर करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेले आदेश ७७ पैकी केवळ २३ मंत्र्यांनीच पाळले आहेत. ५४ मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या आदेशाचे पालन केलेले नाही.
- हरीष गुप्ता / लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत आपल्या मालमत्तांचा तपशील सादर करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेले आदेश ७७ पैकी केवळ २३ मंत्र्यांनीच पाळले आहेत. ५४ मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या आदेशाचे पालन केलेले नाही.
पंतप्रधानांसह २८ कॅबिनेट मंत्री असून, त्यापैकी १९ जणांनी विवरणपत्र सादर केले आहे. स्वतंत्र पदभार असलेल्यांसह ४८ राज्यमंत्री आहेत. त्यातील फक्त ४ जणांनी सांपत्तिक/कर्जविषयक विवरणपत्र सादर केले आहे. पंतप्रधानांनी सर्वांत आधी आपले विवरणपत्र सादर केले. त्यांच्यापाठोपाठ वित्तमंत्री अरुण जेटली, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, कायदामंत्री रविशंकर प्रसाद, पोलादमंत्री चौधरी बिरेंदर सिंग, परराष्टÑमंत्री सुषमा स्वराज, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विवरणपत्र दाखल केले.
अन्न प्रक्रियामंत्री हरसिमरत कौर बादल यांनी यावर्षाचे विवरणपत्र दिलेले नाही. २०१४-१५ मध्ये त्या ८७.४५ कोटींच्या संपत्तीसह सर्वांत श्रीमंत महिला मंत्री होत्या. महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी, अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, गृहमंत्री राजनाथसिंग, रसायने व खतेमंत्री अनंत कुमार यांनीही विवरणपत्र दिलेले नाही. २०१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये सर्वच मंत्र्यांनी विवरणपत्र दिले होते. गृहमंत्रालयाच्या आचारसंहितेनुसार दरवर्षी ३१ आॅगस्टपूर्वी मंत्र्यांना आपले सांपत्तिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. स्वत: बरोबरच पत्नी आणि अवलंबून असलेल्या मुलांच्या मालमत्तेचाही तपशील विवरणपत्रात द्यावा लागतो.
कोणत्याही मंत्र्यांच्या संपत्तीत अवास्तव वाढ नाही
माहिती सादर करणा-या कोणत्याही मंत्र्यांच्या संपत्तीत यंदा अवास्तव वाढ झालेली नाही. प्रकाश जावडेकर यांची संपत्ती ७.८६ कोटी रुपयांची आहे. तथापि, त्यांच्या पत्नीवर ३.०५ कोटींचे कर्ज आहे. मोदी यांच्या मुदत ठेवी ५१.२७ लाखांवरून ९०.२६ लाखांवर गेल्या आहेत. २०१६-१७ मध्ये त्यांनी पुस्तकांतून मिळणारे उत्पन्नच दाखविलेले नाही. आदल्या वर्षी त्यांना रॉयल्टीपोटी १२.३५ लाख रुपये मिळाले होते.
यंदा त्यांनी हे उत्पन्न दान केले असावे, असे दिसते. त्याचा तपशील त्यांनी दिलेला नाही. त्यांचे उत्पन्न २८ लाखांनी वाढून २.०१ कोटी झाले. आदल्या वर्षी ते १.७३ कोटी होते. अरुण जेटली हे पुन्हा सर्वांत श्रीमंत मंत्री ठरले
आहेत. तथापि, मंत्री झाल्यापासून त्यांच्या संपत्तीत थोडी घट झाली आहे. रामविलास पासवान यांच्याकडे सर्वांत कमी संपत्ती आहे.