५० हेक्टर जागेत ५५,५०० रोपांची लागवड
By admin | Published: July 9, 2015 10:46 PM2015-07-09T22:46:55+5:302015-07-10T00:26:47+5:30
खंबाळे : वनविभागाच्या जागेवर साकारणार वन
खंबाळे : वनविभागाच्या जागेवर साकारणार वन
नाशिक : शासनाच्या आवाहनानुसार ओसाड भूखंडावर वननिर्मितीसाठी सॅमसोनाईट साऊथ एशिया कंपनीने पुढाकार घेत ५० हेक्टर जागेवर त्रिपक्षीय कराराअंतर्गत ५५ हजार पाचशे रोपांच्या लागवड व संवर्धनासाठी तयारी दर्शविली आहे.
औद्योगिक प्रतिष्ठान व अशासकीय संस्थांच्या माध्यमातून ओसाड जागांवर हिरवळ करण्यासाठी शासनाकडून औद्यागिक संस्थांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार इगतपुरी तालुक्यात वनविभागाच्या ५० हेक्टर जागेवर वनीकरणासाठी सॅमसोनाईट कंपनीने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत घोटी-खंबाळे शिवारात सुमारे ५५ हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. लावलेल्या रोपांचे पुढील सात वर्षांपर्यंत संरक्षण व संवर्धनाची जबाबदारीदेखील सॅमसोनाईट व तैनवाला फाउण्डेशनकडून स्वीकारण्यात आल्याची माहिती सॅमसोनाइटचे मिलिंद वैद्य, व्यवस्थापक सुयोग जोशी, बन्सीधर जोशी, अनील थोरवे, सतीश पावसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे. खंबाळेगावाच्या हद्दीतील वनविभागाच्या वन कक्ष क्रमांक ३२६ मधील ५० हेक्टर जागेवर रोपांची लागवड के ली जाणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वनविभाग, सॅमसोनाईट औद्योगिक संस्था व तैनवाला फाउण्डेशन असा त्रिपक्षीय करार गेल्या महिन्यात करण्यात आल्याचे सतीश पावसे व वाय. एम. सिंग यांनी यावेळी सांगितले. प्रस्तावाच्या मंजुरीसाठी मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील, उपवनसंरक्षक अनिता पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय अहिरे आदि प्रयत्नशील होते.
या जागेवर करण्यात येणार्या रोपांच्या लागवडीमध्ये आवळा, चिंच, देशी आंबा, जांभूळ, पिंपळ, मोह, सावर, शिरस, सीताफळ, खैर, आपटा, कांचन, करंज, कडूनिंब आदि भारतीय प्रजातींच्या समावेश आहे. रोपांच्या लागवडीमध्ये संयोजकांमार्फत परिसरातील शालेय विद्यार्थी, सामाजिक संघटना, गोंदे औद्योगिक वसाहतीमधील कर्मचारी वर्ग, स्थानिक नागरिक यांच्या सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ५० हेक्टर अर्थात १२५ एकर जागेवर दोनशे आदिवासी मजुरांमार्फत ५५ हजार ५०० खड्डे खोदून तयार ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी लोकसहभागातून रोपांची लागवडीला प्रारंभ करण्यात आला असून, अद्याप ११ हजार झाडे लावण्यात आली आहेत. येत्या महिनाभरात रोपांचे लक्ष्य गाठणे शक्य होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.