तब्बल १७ वर्षांपासून 'तो' ऍम्बेसेडर कार घेऊन एकटाच जंगलात राहतोय; नेमकं काय झालंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 08:54 PM2021-10-07T20:54:44+5:302021-10-07T20:58:34+5:30
एका घटनेमुळे आयुष्य बदललं; सुपारीची शेती करणाऱ्या व्यक्तीवर जंगलात राहण्याची वेळ
कर्नाटकमधील एक व्यक्ती तब्बल १७ वर्षांपासून जंगलात वास्तव्यास आहे. एका सफेद ऍम्बेसेडर कारमध्ये ते राहत आहेत. समाजापासून दूर जंगलात राहून चंद्रशेखर गौडा एकाकी आयुष्य जगत आहेत. त्यांचं वय ५६ वर्षे आहे. कृषी कर्ज फेडू न शकल्यानं गौडा यांच्यावर ही वेळ आली. बँकेनं दीड एकर जमीन ताब्यात घेतल्यानं गौडा यांनी जंगलात राहू लागले.
चंद्रशेखर गौडा दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुलिया जवळ असलेल्या घनदाट जंगलात राहतात. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जंगलात ३ ते ४ किलोमीटर चालत जावं लागतं. गौडा त्यांची आवडती ऍम्बेसिडर कार घेऊन गेल्या १७ वर्षांपासून जंगलात वास्तव्याला आहेत. विशेष म्हणजे यातील रेडियो अद्यापही सुरू आहे.
चंद्रशेखर अतिशय कृश झाले आहेत. त्यांच्या डोक्यावरील केस कमी झाले आहेत. वय वाढल्यानं सुरकुत्या पडल्या आहेत. त्यांची हाडंदेखील दिसू लागली आहेत. त्यांना बऱ्याच कालावधीपासून दाढीदेखील केलेली नाही. चंद्रशेखर यांच्याकडे केवळ दोन जोडी कपडे आणि एक रबरी चप्पल आहे.
नेकराल केमराजे गावात चंद्रशेखर यांच्या मालकीची दीड एकर जमीन होती. तिथे ते सुपारीचं उत्पादन घ्यायचे. २००३ मध्ये त्यांनी एका सहकारी बँकेकडून ४० हजारांचं कृषी कर्ज घेतलं. त्याची परतफेड त्यांना करता आली नाही. त्यामुळे बँकेनं त्यांच्या शेताचा लिलाव केला. या घटनेनं चंद्रशेखर यांचं आयुष्य बदललं. ते जंगलात निघून गेले. तिथेच ते टोपल्या तयार करतात आणि आसपासच्या गावांमध्ये विकून गुजराण करतात.