लक्झेमबर्गमध्ये शिक्षकांना ५८ लाखांचे वार्षिक वेतन; त्यानंतर स्वित्झर्लंड, जर्मनीचा क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 05:38 AM2021-10-08T05:38:31+5:302021-10-08T05:38:43+5:30
शिक्षकांना सर्वाधिक पगार देणाऱ्या देशांच्या यादीत नॉर्वे चौथ्या क्रमांकावर आहे. तिथे शालेय शिक्षकाला वार्षिक ३५ लाख रुपये पगार मिळतो.
वाॅशिंग्टन : जगामध्ये शिक्षकांना सर्वात जास्त पगार युरोपमधील लक्झेमबर्ग या देशात दिला जातो. तिथे शिक्षकांना प्रत्येकी वार्षिक ५८ लाख रुपये पगार आहे. शिक्षकांना सर्वाधिक पगार देणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे स्वित्झर्लंड व जर्मनी आहे. अमेरिका मात्र सहाव्या क्रमांकावर आहे.
यासंदर्भात जागतिक बँक, युरोपातील देश, तसेच अमेरिकेकडून माहिती गोळा करण्यात आली. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये २००९ पासून आतापर्यंत शिक्षकांच्या पगारात ४.६ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मूळ अमेरिकी नागरिक शिक्षकीपेशा स्वीकारण्यास फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे विदेशातील शिक्षकांची अमेरिकी शिक्षण संस्थांमध्ये नियुक्ती करण्याचे प्रमाण वाढले आहे. लक्झेमबर्ग या युरोपीय देशात शालेय शिक्षकांना वार्षिक ५८ लाख रुपये पगार मिळतो. २०१७ सालापासून या देशातील शिक्षकांच्या पगारात उत्तम वाढ झाली आहे, असे युरोपियन कमिशनने म्हटले आहे. लक्झेमबर्गखालोखाल स्वित्झर्लंडमधील शिक्षकांना प्रत्येकी वार्षिक ५१ लाख रुपये पगार मिळतो, तर जर्मनीतील शिक्षकांना प्रत्येकी वार्षिक ४७ लाख रुपये पगार मिळतो.
शिक्षकांना सर्वाधिक पगार देणाऱ्या देशांच्या यादीत नॉर्वे चौथ्या क्रमांकावर आहे. तिथे शालेय शिक्षकाला वार्षिक ३५ लाख रुपये पगार मिळतो. त्यानंतर डेन्मार्कमध्ये हे प्रमाण ३४ लाख रुपये आहे. या यादीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेत शिक्षकाला वार्षिक ३२ लाख पगार मिळतो. अमेरिकेतील न्यूयॉर्क, सॅनफ्रॅन्सिस्को, बेकर्सफिल्ड, फ्रेन्सो आदी भागांत शिक्षकांना जास्त पगार आहेत.
भारतात शिक्षकाचा वार्षिक पगार चार लाख
भारतामध्ये शालेय शिक्षकाचे वार्षिक सरासरी उत्पन्न हे ३ लाख ९० हजार रुपये इतके आहे. म्हणजे त्यांना प्रत्येक तासाला २०० रुपये मिळतात. शिक्षकांना कारकीर्दीच्या सुरुवातीला वार्षिक सरासरी २ लाख ६३ हजार ५०० रुपये पगार मिळतो. काही शिक्षण संस्थांमध्ये प्रदीर्घ अनुभव असलेल्या शिक्षकांना वार्षिक ८ लाख रुपयांपर्यंतही पगार देण्यात येतो.