५८ लाख स्थलांतरित पोचले गावी, ४२८६ श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 04:56 AM2020-06-08T04:56:41+5:302020-06-08T04:56:54+5:30
केंद्र सरकारची कामगिरी : ४२८६ श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविल्या
नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशातील विविध भागात अडकून पडलेल्या सुमारे ५८ लाख स्थलांतरित मजुरांना श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांतून त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले आहे. त्यासाठी आतापर्यंत देशभरात ४२८६ श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी शनिवारी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले की, स्थलांतरित मजुरांकरिता श्रमिक रेल्वे गाड्या पाठविण्याची राज्यांकडून होणारी मागणी आता घटत चालली आहे. पूर्वी रोज २५० श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविल्या जात होत्या. आता हीच संख्या १३७वर आली आहे. गुरुवारी व शुक्रवारी देशात ५६ श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या. दरम्यान, काही रेल्वेगाड्या ज्या ठिकाणी जायचे होते, त्या ठिकाणी न पोचता दुसऱ्याच ठिकाणी गेल्याचाही प्रकार घडला होता. अनेक भागातील मजुरांना वाहनेच न मिळाल्याने त्यांनी पायीच आपला प्रवास सुरु केला होता. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अलीकडेच दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, श्रमिक विशेष रेल्वेगाडीने जाणाºया स्थलांतरित मजुरांना त्यांच्या आवश्यकतेनुसार रेल्वेने जेवण, पिण्याचे पाणी, औषधे, कपडे, स्लीपर व अन्य जीवनावश्यक वस्तू मोफत दिल्या होत्या. जे स्थलांतरित मजूर पायी चालत गावाकडे निघाले होते, त्यांना नॅशनल हायवेज आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एनएचएआय) मदतीने श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांमध्ये जागा उपलब्ध करून देऊन गावी पाठविण्यात आले.
श्रमिकांचे लॉकडाऊनमुळे खूप हाल
कोरोना साथीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रेल्वेसेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. त्याचबरोबर रस्त्यावरील सार्वजनिक व खासगी वाहतूक सेवाही ठप्प होती. त्यामुळे देशाच्या विविध भागांत अडकलेले स्थलांतरित मजूर मिळेल त्या वाहनाने किंवा पायी आपल्या गावांकडे निघाले. त्यात त्यांचे खूप हाल होत असल्याने खूप आरडाओरड झाल्यानंतर केंद्र सरकारने १ मेपासून श्रमिक विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. त्यातून ५८ लाख स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी नेण्यात आले.