महाराष्ट्रात ५,८४३ किलोमीटर रेल्वेमार्गांची कामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 07:00 AM2019-07-11T07:00:33+5:302019-07-11T07:00:37+5:30
यंदा ४,६४७ कोटींची तरतूद : १६ नवे रेल्वेमार्ग, १७ मार्गांचे दुपदरीकरण व चार ठिकाणी गेज परिवर्तन
- नितिन अग्रवाल
नवी दिल्ली : महाराष्ट्रात ६९ हजार १८१ कोटी रुपये खर्चून ५,८४३ किलोमीटर लांबीचे रेल्वेमार्ग उभारण्याचे काम जोरात सुरू असून, ८0६ किलोमीटरचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेसाठी ४,६४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, महाराष्ट्रात १६ नवे रेल्वेमार्ग उभारण्यात येत असून, १७ मार्गांचे दुपदरीकरण व चार ठिकाणी गेज परिवर्तन होत आहे. या ३७ रेल्वे योजनांची कामे सध्या सुरू असून, काही पूर्णही झाली आहेत. या योजनांवर या वर्षीच्या माचपर्यंत १२ हजार ७0२ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
आताच्या अर्थसंकल्पात या कामांना वेग देण्यासाठी ४,६४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री गोयल यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांमध्ये ९८ रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या असून, त्या महाराष्ट्रातील विविध स्थानकांमार्गे जातात.
विलंबाची कारणे
रामदास तडस यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात पीयूष गोयल म्हणाले की, रेल्वेची कामे पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करणे कधीच शक्य होत नाही.
राज्य सरकारतर्फे केले जाणारे जमिनीचे संपादन, वन व अन्य खात्यांची मंजुरी मिळण्यास लागणारा वेळ, भौगोलिक परिस्थिती, हवामान, तसेच संप, आंदोलने यामुळे अनेकदा कामे पूर्ण होण्यास अधिक वेळ लागतो. याशिवाय न्यायालयात प्रकरण गेल्यास तिथे किती वेळ लागेल, हे सांगता येत नाही आणि अनेकदा कंत्राटदारांची स्थिती व अटी यामुळेही कामांना विलंब होऊ शकतो.