5G Service: 1 ऑक्टोबरला PM नरेंद्र मोदींच्या हस्ते 5Gची लॉन्चिंग, पहिल्या टप्प्यात 'या' 13 शहरात सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 05:52 PM2022-09-30T17:52:46+5:302022-09-30T17:52:58+5:30
5G Service: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी 5G सेवेचे उद्घाटन करणार आहेत.
5G Services Launch: 5G इंटरनेट सेवा (5G Internet) लवकरच भारतात सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) उद्या म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी प्रतिकात्मक पद्धतीने 5G सेवेचे उद्घाटन करणार आहेत. 1 ऑक्टोबरपासून दिल्लीतील प्रगती मैदानावर 4 दिवसीय इंडिया मोबाइल काँग्रेसचा (India Mobile Congress) कार्यक्रम सुरू होत आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी देशात हायस्पीड 5G इंटरनेट सेवा सुरू करतील.
चार ठिकाणी यशस्वी चाचणी
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने यापूर्वीच देशात चार ठिकाणी यशस्वी 5G चाचण्या केल्या आहेत. या चार ठिकाणांमध्ये दिल्लीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंगळुरूचे मेट्रो, कांडला बंदर आणि भोपाळचे स्मार्ट सिटी क्षेत्र समाविष्ट आहे. या चार ठिकाणी 5G साठी लागणारी पायाभूत सुविधाही तयार आहे. रिपोर्टनुसार, देशातील 100 दशलक्षाहून अधिक लोकांना पुढील वर्षी म्हणजे 2023पर्यंत 5G सेवा मिळेल.
कोणत्या शहरांमध्ये सुरू होणार
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैश्वान यांनी यापूर्वी सांगितले की, 5G हळूहळू देशात वेगवेगळ्या टप्प्यात सुरू केले जाईल. केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या टप्प्यात 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली जाईल. यामध्ये दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, कोलकाता, जामनगर, लखनऊ, पुणे या शहरांचा समावेश आहे. दोन वर्षांनंतर 5G सेवेचा देशभरात झपाट्याने विस्तार केला जाईल.