५जीच्या स्पीडने नोकऱ्या मिळणार; २०२२मध्ये दीड लाखांहून अधिक लोकांना लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 09:05 AM2021-06-21T09:05:04+5:302021-06-21T09:05:18+5:30
ऑनलाइन खरेदी, शिक्षण, डॉक्टरांचा सल्ला, खाद्यपदार्थ, औषधे हे सर्व एका क्लिकवर उपलब्ध होऊ लागले.
कोरोना महासाथीने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीत अर्थचक्र मंदावले. अनेकांचे रोजगार हिरावले गेले. एकीकडे असे चित्र असताना ऑनलाइन व्यवहारांत मोठी वाढ झाली. ऑनलाइन खरेदी, शिक्षण, डॉक्टरांचा सल्ला, खाद्यपदार्थ, औषधे हे सर्व एका क्लिकवर उपलब्ध होऊ लागले. या सगळ्या गोष्टींमुळे लोकांना अतिजलद इंटरनेटची गरज भासू लागली. त्यामुळेच सगळ्यांचे लक्ष ५जी नेटवर्ककडे लागले आहे.
रोजगाराची सुसंधी
भारतात ५जी सेवा सुरू करण्यासाठी लवकरच दीड लाखांहून अधिक लोकांची आवश्यकता भासणार आहे. आयपी नेटवर्किंग, फर्मवेअर, ऑटोमेशन, मशिन लर्निंग, बिग डेटा एक्स्पर्ट, सायबर सुरक्षा तज्ज्ञ, इलेक्ट्रानिक इंजिनीअर्स इत्यादींची मागणी वाढेल. दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी मोठ्या संख्येने वाढतील. इंटरनेटचा स्पीड वाढण्याबरोबरच नोकऱ्या मिळण्याची गतीदेखील वाढणार आहे.
५जीचे सध्याचे चित्र काय आहे?
५जी तंत्रज्ञान सेवा जगभरातील ६० हून अधिक देशांमध्ये सुरू झाली आहे. भारतात पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत ५जीचे आगमन अपेक्षित आहे.
५जीसाठी भारतीय उत्सुक
२०२५ पर्यंत भारतीयंचा डेटावापर दरमहा २५जीबीपर्यंत वाढणार आहे. ५जी कनेक्शनसाठी भारतीय अधिक पैसे खर्च करण्यासही तयार आहेत. २०२५ पर्यंत ९२ कोटी भारतीयांकडे मोबाइल असतील. त्यातील जवळपास ९ कोटी लोकांकडे ५जी कनेक्शन असेल. त्यामुळे भारतीय तरुणांना या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. पुढील वर्षापर्यंत ५जी तंत्रज्ञान भारतात येण्याची शक्यता आहे.
कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या मिळणार
५जी नेटवर्कचे जाळे पसरवण्याबरोबरच त्याची देखभाल आणि दुरुस्ती यांसाठी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञांची गरज भासणार आहे. यात ट्रान्समिशन स्टेशन इंजिनीअर, ड्राइव्ह टेस्ट इंजिनीअर आणि मेन्टेनन्स इंजिनीअर या पदांचा समावेश आहे.याशिवाय सर्किट डिझायनर, स्ट्रॅटेजिक डेव्हलपर, नेटवर्क इंजिनीअर, प्रॉडक्ट डिझायनर या पदांसाठीही रोजगारसंधी मिळतील. मशीन-टू-मशीन कम्युनिकेशन, टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग, इन्फ्रास्ट्रक्चर तसेच सर्व्हिस या क्षेत्रांमध्येही मुबलक प्रमाणात रोजगार मिळू शकणार आहेत.