6 किलोमीटर प्रवासासाठी उबरनं मागितले 5,000 रुपये भाडे
By Admin | Published: May 5, 2017 04:24 PM2017-05-05T16:24:40+5:302017-05-05T16:29:33+5:30
केवळ 5 किलोमीटर प्रवासाचे 5,325 रुपयांचे बिल एका उबर टॅक्सी चालकाने प्रवाशाच्या हातात दिले.
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 5 - म्हैसूरहून आलेल्या एका इंजिनिअरने सिटी रेल्वे स्टेशनहून सॅटलाइट बस स्थानकापर्यंत जाण्यासाठी उबर टॅक्सीतून प्रवास केला. जवळपास 6 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासाचं झालेल्या बिलाची किंमत तुम्ही ऐकली तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. उबर टॅक्सी चालकाने केवळ 5 किलोमीटर प्रवासाचे त्या इंजिनिअरला 5,325 रुपयांचे भाडे झाल्याचे चालकाने सांगितले.
इंजिनिअर असलेल्या प्रवीणला बुधवारी येथून म्हैसूरकडे पुन्हा परतायचे होते. या प्रवासासाठी त्याला टॅक्सची गरज होती, मात्र त्याच्या मोबाइल फोनमध्ये उबरचं अॅप नव्हतं. यासाठी सिटी रेल्वे स्टेशनहून टॅक्सी उपलब्ध करुन देण्यासाठी त्यानं एका एजंटला गाठलं.
व त्याला सांगितले की, "मला म्हैसूरमध्ये लवकर पोहोचायचे होते. मात्र नेमकी 3.30 वाजता असलेली ट्रेन चुकली. यानंतर म्हैसूरकडे जाण्यासाठी सॅटलाइट बस स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी मी टॅक्सी केली. सकाळी 4.30 वाजता टॅक्सीत बसलो आणि बस स्थानकावर पोहोचल्यानंतर मीटरकडे पोहतो तर काय तब्बल 5,352 रुपयांचे भाडे मला दिसले. मी चालकाला विचारले तर त्याने सांगितले की आताचे भाडे केवळ 103 रुपये आहे उर्वरित जुन्या प्रवाशाचे भाडे आहे. हे ऐकल्यानंतर मला विश्वासच बसला नाही कारण गेल्या 2 वर्षांत मी केवळ दुस-यांदाच उबर टॅक्सीचा वापर करत आहे."
यावेळी प्रवीणनं चालकाला सांगितले की, यंत्रात काही तांत्रिक बिघाड असू शकतो. तसेच प्रवीण केवळ 103 रुपयेच भाडे देणार असल्याचे सांगितले, तेव्हा चालक ती रक्कम स्वीकारण्यास तयारच नव्हता. यानंतर चालकाने उबर कॉल सपोर्टला फोन केला, त्यांनी सांगितले संपूर्ण भाडे वसुल करुन घे अथवा भाडे न दिल्यास ग्राहकाला गाडीतून खाली उतरू देऊ नकोस", असा फर्मानच संबंधित चालकाला देण्यात आला.
त्यावरही प्रवीणनं पैसे द्यायला नकार दिल्यानंतर चालकाने पोलिसांना संपर्क साधला. त्यावेळी प्रवीणला थोडी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाल्यासारखे वाटले कारण चालकासोबत हुज्जत घालण्याऐवजी त्याला पोलिसांकडे दाद मागण्याची संधी मिळणार होती. पण इथेही भलतीच समस्या निर्माण झाली. ही दुसरी समस्या काय तर पोलीस स्टेशनपर्यंतच भाडे कोण भरणार? बरीच वादावादी झाल्यानंतर चालक पोलीस स्टेशनपर्यंत येण्यासाठी तयार झाला.
भाई तारयनपुरा पोलीस स्टेशन पोहोचल्यानंतर प्रवीणनं संपूर्ण हकिगत पोलिसांना सांगितली. त्यानंतर संबंधित टॅक्सी चालक ग्राहकाकडून केवळ 103 रुपयेच वसुल करू शकतो, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या टॅक्सी चालकानं "बंगळुरू मिरर" वृत्तपत्रासोबत संवाद साधताना सांगितले की, "माझ्याकडे संपूर्ण भाडे वसुल करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण उर्वरित 5 हजार रुपये माझ्या खात्यातून कापले जाण्याची भीती मला होती".
दरम्यान, उबर कंपनीच्या एका अधिका-यांनी सांगितले की, " टॅक्सीच्या मीटरमध्ये झालेला तांत्रिक बिघाड आता दुरुस्त करण्यात आला आहे. व त्यामुळे ग्राहकांना झालेल्या त्रासबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत."