टुथपीकच्या डीएनएमुळे ६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा; ५ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण आणि हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 06:10 AM2022-05-23T06:10:51+5:302022-05-23T06:11:38+5:30
उत्कृष्ट फॉरेन्सिक आणि शास्त्रोक्त तपासाच्या आधारे अलीकडेच गांधीनगर, गुजरात पोलिसांनी अपहरण, हत्येप्रकरणी ६ आरोपींना जन्मठेप मिळवली.
डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदाबाद : उत्कृष्ट फॉरेन्सिक आणि शास्त्रोक्त तपासाच्या आधारे अलीकडेच गांधीनगर, गुजरात पोलिसांनी अपहरण, हत्येप्रकरणी ६ आरोपींना जन्मठेप मिळवली.
२०१७ मध्ये नवनीत प्रकाशन प्रिंटिंग प्रेस ,गांधी नगर, गुजरातचे मालक नवीन शाह, यांचे अपहरण करुन ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र खंडणी मिळण्या पूर्वीच अपहरण कर्त्यानी नवीन शाहची हत्या केली. त्यांचा मृतदेह वात्रक नदीत फेकून दिला. याप्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली होती. शाह यांच्या कडे पूर्वी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच टीप दिल्याचे तपासात उघड झाले. या ८ पैकी ६ आरोपींना सत्र न्यायालयाने दोषी ठरवून अपहरण आणि हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अटक करून आरोपपत्र दाखल करण्यात आलेले इतर दोन आरोपी जामीन मिळवुन नंतर परदेशात पळून गेले. पोलिसांनी केलेल्या उत्तम तपास व शास्त्रोक्त पुराव्यांमुळे पोलिसांनी दोष सिध्द केला.
पोलिसांनी प्रत्येकाला गुन्ह्याशी जोडण्याचे आव्हान पेलताना मिळवलेले पुरावे:
आरोपी १ : गुन्ह्यात वापरलेली एसयूव्ही कार आरोपींपैकी एकाच्या मालकीची होती परंतु ती बनावट नंबर प्लेटने वापरली जात होती. खरी व बनावट नंबर प्लेट जप्त व मालकीची कागदपत्रे
आरोपी २ : कारमध्ये एक टूथ पिक सापडले. पोलीस पथकाने टुथपिकातून डीएनए नमुने घेतले. ते एका आरोपीच्या डीएनएशी जुळले.
आरोपी ३ : मृताला बांधण्यासाठी वापरलेले सेलोटेपचे उरलेले बंडल दुसऱ्या एका आरोपीकडून जप्त करण्यात आले. तपासणीत दोन्ही टेपचे नमुने जुळले.
आरोपी ४ : आरोपींपैकी एकाने मयताचे तोंडावर सेलोटेप चिकटवल्यानंतर ती दाताने कापली होती. आरोपीच्या तोंडाभोवती चीकटवलेल्या सेलो टेप वरील डीएनएचा नमुना दातांनी कापणाऱ्या आरोपीच्या डीएनएशी जुळला.
आरोपी ५ : तपास पथकाला एसयूव्ही कारच्या स्टिअरिंगवर एका आरोपीच्या बोटांचे ठसे मिळाले.
आरोपी ६ आणि ७ : तपासादरम्यान पोलिसांनी एका आरोपींकडून नवीन शाह यांची सोन्याची चेन आणि दुसऱ्याकडून पैशांचे पॅाकेट जप्त केले.
आरोपी ८ : कॉल रेकॉर्डच्या तांत्रिक विश्लेषणात टीप देणाऱ्या माजी कर्मचाऱ्याचा दोष सिद्ध झाला.