ब्रेकिंग! आसाम-मिझोराम सीमा संघर्ष तापला; गोळीबारात आसामच्या सहा पोलिसांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 08:03 PM2021-07-26T20:03:18+5:302021-07-26T20:26:20+5:30
आसाम-मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचे एकमेकांवर आरोप; अमित शहांनी हस्तक्षेप करण्याची मागणी
गुवाहाटी: आसाम आणि मिझोराम यांच्यातील सीमा वाद तापला आहे. आसाम-मिझोरामच्या सीमेवर झालेल्या गोळीबारात आसामच्या ६ पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. यामुळे सीमा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. गृहमंत्री अमित शहांनी हस्तक्षेप करण्याची मागणी दोन्ही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
I am deeply pained to inform that six brave jawans of @assampolice have sacrificed their lives while defending constitutional boundary of our state at the Assam-Mizoram border.
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) July 26, 2021
My heartfelt condolences to the bereaved families.
'आसाम-मिझोरामच्या सीमेवर आपल्या सीमेचं रक्षण करत असताना आसाम पोलीस दलाचे ६ शूर पोलीस शहीद झाले आहेत, हे सांगताना मला अतिशय दु:ख होतंय. माझ्या सहवेदना त्यांच्या संतप्त कुटुंबियांच्या सोबत आहेत,' असं मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दोन्ही राज्यांच्या सीमेवरील तणाव वाढला असताना ६ पोलिसांचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती पुढे आल्यानं सीमा प्रश्न आणखी हिंसक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आसाम-मिझोरामच्या सीमेवर झालेल्या हिंसाचारासाठी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच्या पोलिसांना जबाबदार धरलं. मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून त्यांचे पोलीस शांतता राखतील असं आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री सर्मा यांनी ट्विटरवरून दिली. तर मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी आसामच्या पोलिसांनी लाठीमार करून अश्रूधूर सोडल्याचा आरोप केला.