एका दिवसात 6 जणांचा मृत्यू...! पुन्हा डोकं वर काढतोय कोरोना? आली आहे व्हॅक्सीनचा बूस्टर घेण्याची वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 11:06 AM2023-12-22T11:06:11+5:302023-12-22T11:07:20+5:30
देशभरात 594 नवे रुग्णही आढळून आले आहेत. मे महिन्यानंतरचा अर्थात गेल्या सात महिन्यांतील हा मोठा आकडा आहे...
देशात पुन्हा एकदा कोरोन व्हायरल परततो की काय अशी धास्ती वाटू लागली आहे. कारण कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिअंट अनेक नव्या सब-व्हेरिअंटमध्ये तयार झाला आहे. सर्वात नवा सब-व्हेरिअंट म्हणजे जेएन.1, यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते. देशात (भारतात) गुरुवारी कोरोनामुळे सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यांपैकी तीन जण केरळमधील, दोन जण कर्नाटकातील, तर एक जण पंजाबातील आहे. याशिवाय देशभरात 594 नवे रुग्णही आढळून आले आहेत. मे महिन्यानंतरचा अर्थात गेल्या सात महिन्यांतील हा मोठा आकडा आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार, 'कोविड-19 हा गंभीर लक्षणे अथवा मृत्यूचे कारण होऊ शकत नाही. पॉझिटिव्ह आढळणाऱ्या अधिकांश लोकांमध्ये केवळ हलक्या स्वरुपाची लक्षणे आढळत आहेत. अद्याप कोई ट्रेव्हल अडव्हायझरी जारी करण्याचा अथवा विमानतळांवर RT-PCR टेस्ट अनिवार्य करण्याचा सरकारचा कुठल्याही प्रकारचा प्लॅन नाही.
भारतासह अनेक देशांमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येसंदर्भात बोलताना तज्ज्ञांनी म्हटले आहे की, याला नवी लाट म्हणण्यासाठी काही दिवस वाट बघावी लागेल. घाबरण्याचे कारण नाही. मात्र, याच वेळी, JN.1 हा कदाचित WHO चा शेवटचा 'व्हेरिअंट ऑफ इंटरेस्ट' नसेल, यामुळे सावध राहणे आवश्यक आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बुस्टर डोस घेणं आहे आवश्यक? -
कोरोना लस गंभीर आजारांपासून बचाव करण्यात यशस्वी ठरली आहे. मात्र वेळेनुसार त्यांचा शरिरावरील परिणाम कमी होतो. बऱ्याच लोकांना कोरोना झाल्यानंतर अथवा किमान 2 डोस घेतल्यानंतरही ते दुसऱ्यांदा संक्रमित झाले आहेत. यामुळेच WHO ने JN.1 व्हेरिअंटला 'व्हेरिअंट ऑफ कंसर्न' घोषित केले आहे. अपोलो रुग्णालयातील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. एस. रामासुब्रमण्यन यांनी म्हटले आहे की, 'वृद्ध, रोग प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लोक आणि ज्यांना काही गंभीर आजार आहेत अशांना बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे.'