जगाच्या सफरीवर पहिल्यांदाच नौदलाच्या 6 महिला अधिकारी, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 01:41 PM2017-09-10T13:41:49+5:302017-09-10T13:47:57+5:30
धैर्याने सामना करत एका छोट्याशा शिडाच्या बोटीवर स्वार होऊन आपल्या भारतीय नौदलाच्या 6 महिला अधिकारी 'नाविका सागर परिक्रमा’ या उपक्रमांतर्गत जगप्रवासाला निघाल्या आहेत.
नवी दिल्ली, दि. 10 - समुद्रप्रवास म्हटलं की खवळलेला अथांग सागर, उंचच उंच उसळणाऱ्या लाटा, हेलकावे देणारा जोराचा वारा, आणि हिंसक सागरी जीव. सगळं काही डोळ्यासमोर येतं. पण या सगळ्याचा धैर्याने सामना करत एका छोट्याशा शिडाच्या बोटीवर स्वार होऊन आपल्या भारतीय नौदलाच्या 6 महिला अधिकारी 'नाविका सागर परिक्रमा’ या उपक्रमांतर्गत जगप्रवासाला निघाल्या आहेत. भारतीय बनावटीच्या आयएनएसव्ही ‘तारिणी’ या नौकेने त्या आज रवाना होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 27 ऑगस्ट रोजी झालेल्या मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पृथ्वी प्रदक्षिणेसाठी सज्ज असलेल्या आयएनएस तारिणीच्या सहा महिला अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या त्यांच्या भेटीचा उल्लेख केला.
आयएनएसव्ही तारिणीवरील चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर स्वाती पी, लेफ्टनंट ऐश्वर्या बोद्दापती, लेफ्टनंट विजया देवी , लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे. आशियातील महिलांनी समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे आणि यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारीही सुरू होती. समुद्रमार्गे संपूर्ण पृथ्वी परिक्रमेचा हा प्रवास 21600 नॉटीकल मैलांचा आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी 8 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यादरम्यान ही सफर फ्रीमेंटल (ऑस्ट्रेलीया), लिटलटन (न्युझीलंड), पोर्ट स्टॉन्ले (फॉकलॅन्ड), आणि केप टाऊन या 4 ठिकाणी दुरुस्तीसाठी व रसदीसाठी थांबणार आहे.
Today is a special day! 6 women officers of the Navy begin their journey of circumnavigating the globe on board INSV Tarini.
— Narendra Modi (@narendramodi) September 10, 2017
आयएसएनव्ही तारिणी, या 55 फुट नौकेची बांधणी गोव्यातील मेसर्स एक्वारीअस शिपयार्ड प्रा. लि. या कंपनीने केली आहे. 18 फेब्रुवारी 2017 रोजी भारतीय नौदलात या नौकेचा समावेश करण्यात आला. या जलप्रवासाकरिता सर्व महिला कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा भाग म्हणून त्यांनी आयएसएनव्ही म्हादई आणि आयएसएनव्ही तारिणी मधून आतापर्यंत सुमारे 20 हजार सागरी मैलाचा जलप्रवास केला आहे. ज्यामध्ये 2016 व 2017 मधील दोन मोहिमा आणि डिसेंबर 2016 मधील गोवा ते केप टाऊन या जलप्रवासाचा समावेश आहे.
या मोहिमेला ‘नाविका सागर परिक्रमा’ हे नाव देण्यामागे देशातील महिला सशक्तीकरणाला मजबूती देणे आणि भारतीय नौसेनेतर्फे सागरी नौकानयनाचा प्रसार करणे हा उद्देश आहे. ही मोहिम देशातील तरुणांना समुद्राचे ज्ञान घेण्यास आणि साहस तसेच परस्पर सदभाव वाढवण्यास प्रेरित करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
#NavikaSagarParikrama 2day is D-Day. 6 naval offrs set sail onboard #INSVTarini at 1300h as @DefenceMinIndia Smt @nsitharaman flags them off pic.twitter.com/hs37wF7P1k
— SpokespersonNavy (@indiannavy) September 10, 2017
मन की बात मध्ये काय म्हणाले होते पंतप्रधान
मला एका छोट्या वयाच्या मुलींना भेटण्याची संधी मिळाली त्यात काही हिमालयात जन्मल्या होत्या. समुद्राशी ज्यांचे कधीच नाते नव्हते, अश्या आपल्या देशातील सहा मुली ज्या नौदलात काम करत होत्या त्यांची हिम्मत आणि आत्मविश्वास सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे. या सहा मुली छोटी बोट घेऊन INS तारिणी त्या समुद्र ओलांडण्यासाठी निघाल्या या अभियानाला नाव देण्यात आले ‘नाविका सागर परिक्रमा ’आणि त्या पूर्ण जगाचे भ्रमण करून काही महिन्यांनी भारतात परतल्या. कधी एकावेळी ४०-४० दिवस पाण्यात घालवले. कधी ३०-३० दिवस पाण्यात घालवले. समुद्राच्या लाटांमध्ये हिंमतीने या सहा मुली. ही जगभरातील पहिलीच घटना असेल. कोण भारतीय असेल ज्याला अश्या मुलींचा गर्व वाटणार नाही! मी या मुलींच्या हिंमतीला सलाम करतो आणि मी त्यांना म्हाणालो त्यांनी हा अनुभव सर्व देशवासियांना सांगावा. मी पण नरेंद्र मोदी ॲपवर त्यांच्या अनुभावासाठी एक वेगळी जागा उपलब्ध करून देणार आहे. कारण त्यांचे अनुभव आपण जरूर वाचावेत कारण ती एकाप्रकारची साहस कथा आहे, स्वानुभवाची कथा आहे आणि मला आनंद होईल या मुलींची गोष्ट आपल्यापर्यंत पोहचविल्यास, माझ्या या मुलींना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.