फटाके फोडणाऱ्यांना 6 महिने तर साठवण करणाऱ्यांना 3 वर्षांची शिक्षा; अरविंद केजरीवाल यांचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 04:53 PM2022-10-19T16:53:51+5:302022-10-19T16:56:21+5:30
राजधानी दिल्लीत फटाक्यांवर आधीपासून बंदी होतीच, आता सरकारने नियम आणखी कठोर केले आहेत.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत फटाक्यांवर आधीपासून बंदी होतीच, आता सरकारने आणखी एक फर्मान काढून दंडाची घोषणा केली आहे. राजधानीत कोणीही फटाके फोडताना आढळल्यास त्याला 200 रुपये दंड ठोठावला जाईल, आणि 6 महिने तुरुंगवासही भोगावा लागू शकतो, असा आदेश दिल्ली सरकारने काढला आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
साठवण करणाऱ्यांना 3 वर्षांची शिक्षा
फटाके फोडणाऱ्यांना 6 महिन्यांच्या तुरुंगवासासह 200 रुपये दंड आकारला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर जो कोणी फटाक्यांची साठवणूक करतो, किंवा विक्री करतो, अशांना 5000 रुपयांपर्यंतचा दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो. या आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी सरकारने 408 ग्रुप तयार केले आहेत.
अनेक टीम्स तयार
सहाय्यक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली, दिल्ली पोलिसांच्या 210 टीम्स, आयकर विभागाच्या 165 टीम्स आणि दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीच्या 33 टीम तैनात केल्या जाणार आहेत. गोपाल राय यांनी सांगितले की, दिल्लीत लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी 'दिवे लावा, फटाके फोडू नका' ही मोहीम सुरू केली जाईल. कॅनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कमध्ये सरकार स्वतः 51 हजार दिवे लावणार आहे.
किती दिवस बंदी कायम राहणार?
सरकारच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 2,917 किलो फटाके जप्त केल्याची माहितीही राय यांनी दिली. विशेष म्हणजे, सरकारचा हा आदेश पुढील वर्षी 1 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केजरीवाल सरकारकडून हे पाऊल उचलले जात आहे.