बाहुबली 2 च्या निर्मात्यांना ब्लॅकमेल करणा-या 6 जणांना अटक
By admin | Published: May 17, 2017 12:29 PM2017-05-17T12:29:07+5:302017-05-17T12:49:13+5:30
भारतीय सिनेसृष्टीत नवा इतिहास रचणा-या बाहुबली चित्रपटाच्या निर्मात्यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 17 - भारतीय सिनेसृष्टीत नवा इतिहास रचणा-या बाहुबली चित्रपटाच्या निर्मात्यांना पैशांसाठी ब्लॅकमेल करणा-या सहा जणांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. करण जोहर आणि निर्मात्यांना चित्रपटाची पायरटेड कॉपी वितरित करण्याची धमकी दिली होती. अटक केलेल्या आरोपींमध्ये बिहारमधल्या सिनेमाहॉलच्या मालकाचा समावेश आहे.
इंटरनेटवर पायरटेड कॉपी अपलोड न करण्यासाठी त्यांनी 15 लाखांची मागणी केली होती अशी माहिती पोलीस उपायुक्त अविनाश मोहांती यांनी दिली. 29 एप्रिलला या प्रकरणी निर्मात्यांनी तक्रार दाखल केली. राहुल मेहता नावाच्या व्यक्तीने निर्मात्यांशी संपर्क साधला आणि हाय डेफिनेशन कॉपी उपलब्ध असल्याचे सांगितले. मेहताने त्यांना नमुना व्हिडीओ सुद्धा दाखवला. त्याने पैशांची मागणी केली. निर्मात्यांनी त्याच्याबरोबर चर्चा करुन त्याला खेळवत ठेवले व पोलिसांना माहिती दिली.
हैदराबादच्या ज्युबली हिल्सच्या भागातून 11 मे रोजी राहुल मेहताला अटक केली. त्याने जितेंद्र मेहता, तौफीक आणि मोहम्मद अली यांची नावे दिली. तिघांना दिल्लीतून अटक करण्यात आली. जितेंद्र आणि तौफीक यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. बाहुबलीच्या पहिल्या भागाची पायरसी केल्या प्रकरणी त्यांना मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली होती. बिहारमधील बेगुसराय येथील सिनेमाहॉलचा मालक दीवाकर कुमार आणि चंदन या दोघांनाही पोलिसांनी पाटणा येथून अटक केली. मोनू नावाचा आरोपी फरार आहे. दीवाकरने चित्रपटाची डिजिटल कॉपी बनवली असे पोलिसांनी सांगितले.