महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ
By admin | Published: March 24, 2016 02:10 AM2016-03-24T02:10:42+5:302016-03-24T02:10:42+5:30
केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ करून त्यांना होळीची भेट दिली आहे. ही वाढ जानेवारीपासून लागू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
नवी दिल्ली: केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ करून त्यांना होळीची भेट दिली आहे. ही वाढ जानेवारीपासून लागू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात गेल्या एक जानेवारीपासून सहा टक्के वाढीचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता १२५ टक्के होणार आहे.
दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, ५० लाख कर्मचारी आणि ५८ लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे तयार करण्यात आलेल्या फॉर्म्युल्यानुसार ही वाढ करण्यात आली आहे.
महागाई भत्तावाढीमुळे सरकारवर वार्षिक १४,७२४.७४ कोटी रुपयांचा बोजा पडेल.
यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वाटा ६७९५.५ कोटी तर पेन्शनधारकांचा ७९२९.२४ कोटी एवढा आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११३ टक्क्यांवरून ११९ टक्के करण्यात आला होता. ही वाढ १ जुलै २०१५ पासून लागू झाली होती. तत्पूर्वी एप्रिलमध्ये महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ करून तो ११३ टक्के करण्यात आला होता. १ जानेवारी २०१५ पासून ही वाढ लागू करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)
....................................................
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही लवकरच वाढ?
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढताच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही त्याच प्रमाणात वाढ देण्याची आतापर्यंतची पद्धत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त यांनाही लवकरच याचा फायदा होण्याची शक्यता आहे.