जैशचे ६ दहशतवादी काश्मीरमध्ये जेरबंद
By admin | Published: February 26, 2016 03:49 AM2016-02-26T03:49:45+5:302016-02-26T03:49:45+5:30
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नियंत्रण रेषेजवळ तंगधार सेक्टरमध्ये लष्कराच्या छावणीवरील हल्ल्यात सामील जैश-ए-मोहम्मदच्या सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यात एक
श्रीनगर : गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नियंत्रण रेषेजवळ तंगधार सेक्टरमध्ये लष्कराच्या छावणीवरील हल्ल्यात सामील जैश-ए-मोहम्मदच्या सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यात एक पाकिस्तानी दहशतवादी असून सुरक्षा दलाने उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात एका दहशतवादी अड्ड्याचाही पर्दाफाश केला आहे.
पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी या घटनेची माहिती देताना सांगितले की, जिल्हा मुख्यालयात एक पाकिस्तानी दहशतवादी घुसला असल्याची गोपनीय सूचना मिळाल्यावर सुरक्षा दलाने बारामुल्ला जिल्ह्णात शोध मोहीम राबविली होती. अटकेतील जैशच्या पाकिस्तानी दहशतवाद्याचे नाव मोहम्मद सिद्दिकी ऊर्फ शाहद असून तो सियालकोट येथील रहिवासी आहे.
इतर दहशतवाद्यांमध्ये सुहेल आरिफ, राशिद रसूल भट, जावेद अहमद धोबी,फरहान फयाज आणि एहसान फयाज यांचा समावेश आहे.
गेल्यावर्षी तंगधारमधील लष्करी छावणीवर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी पथकात आपला समावेश होता,अशी कबुली या पाकिस्तानी दहशतवाद्याने जाबजबाबादरम्यान पोलिसांना दिली आहे. लष्कराने हा हल्ला उधळून लावला होता. यात तीन दहशतवादी आणि एका नागरिक ठार झाला होता.
काश्मीर आणि खोऱ्याबाहेर अन्य काही ठिकाणी हल्ल्याची आमची योजना होती. त्यानुसार बारामुल्लाला पोहोचल्यानंतर जैशच्या इतर सदस्यांना आपण भेटणार होतो,असेही सिद्दिकीने पोलिसांना सांगितले.
काश्मिरातील दहशतवादी कारवाया वाढविण्याच्या दृष्टीने येथे आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सिद्दिकीने चालविला होता. परंतु पोलीस आणि सुरक्षा दलाच्या कारवाईमुळे त्याचा हा कट उधळला गेला.
सुरक्षा दलाने अटक केलेल्या दहशतवाद्यांजवळून एक एके ४७ रायफल, पाच मॅग्झिन,१५० गोळ्या, सहा ग्रेनेडस आणि एक वायरलेस सेट जप्त केला. (वृत्तसंस्था)
दहशतवाद्यांनीच ही स्फोटके पेरली असावीत,असा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून दहशतवाद्यांची धरपकड सुरू आहे.
स्फोटके जप्त
बारामुल्ला जिल्ह्यात एका कचरापेटीत लपवून ठेवलेली स्फोटके वेळीच जप्त करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. श्रीनगरपासून ५५ किमी अंतरावरील बारामुल्ला जिल्ह्याच्या ख्वाजा बागेत एका प्रवासी विश्रामगृहाजवळील कचरापेटीत आढळलेली ही स्फोटके नंतर निष्क्रिय करण्यात आली.