मोहन भागवतांच्या ताफ्यातील कारची दुचाकीला धडक; चिमुकल्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 03:36 PM2019-09-11T15:36:46+5:302019-09-11T15:38:47+5:30
सरपंचाच्या दुचाकीला कारची धडक
जयपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या ताफ्यातील कारनं दिलेल्या धडकेत एका सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. भागवत यांच्या ताफ्यातील एका कारनं दुचाकीला धडक दिली. सरसंघचालक राजस्थानातील तिजारामधून परतत असताना हरसोली-मुंडावर रस्त्यावर हा अपघात झाला.
भागवत यांच्या ताफ्यातील कारनं स्थानिक सरपंच चेत्राम यादव यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेत्राम यादव त्यांचा नातू सचिनसह दुचाकीवरुन जात होते. या अपघातात सचिनचा मृत्यू झाला.
भागवत संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीसाठी राजस्थानला आले होते. या बैठकीला संघाशी संबंधित 35 संघटनांचे 200 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच संघानं संबंधित संघटनांची बैठक बोलावली होती.
याआधी मे महिन्यात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील कारला अपघात झाला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भागात हा अपघात झाला. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या गायीला चुकवताना भागवत यांच्या ताफ्यातील कार उलटली होती. त्या अपघातात सीआयएसएफचा एक जवान जखमी झाला होता.