६ वर्षीय मुलीच्या डोक्यात आरोपींनी गोळी झाडली; पण तिनेच ५ लोकांना जीवदान दिले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 08:07 AM2022-05-19T08:07:22+5:302022-05-19T08:10:30+5:30
अवयव दानाबाबत जास्त काही माहिती नसताना मुलीच्या आई वडिलांनी जो कौतुकास्पद निर्णय घेतला त्याबद्दल डॉक्टरांनी तिच्या आई वडिलांचे आभार मानले.
नोएडा – वयाच्या अवघ्या सहा वर्षाच्या मुलीला आरोपींनी गोळी मारली परंतु त्याच मुलीने आयुष्य संपवताना ५ लोकांनी नवं जीवदान दिलं आहे. नोएडा येथे राहणाऱ्या मुलीला डोक्यात गोळी मारण्यात आली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. परंतु ती कोमामध्ये गेली. तिला पुढील उपचारासाठी एम्सला नेण्यात आले. परंतु त्याठिकाणी डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केले. त्यानंतर हीच मुलगी एम्सच्या इतिहासात ऑर्गन डोनेट करणारी सर्वात कमी वयाची डोनर बनली आहे.
वृत्तसंस्थेनुसार, एम्सच्या वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉ. दीपक गुप्ता यांनी म्हटलं की, साडे सहा वर्षाच्या मुलीला गोळी लागल्याने २७ एप्रिलला रुग्णालयात आणलं होते. तिच्या डोक्यात ती गोळी अडकली होती. ब्रेन पूर्णत: निकामी झाले होते. ती ब्रेन डेड अवस्थेतच रुग्णालयात दाखल झाली होती. आम्ही तिच्या कुटुंबाशी बोललो. आमच्या टीमने मुलीच्या नातेवाईकांना अवयव दानाबाबत सांगितले. तिच्या आई वडिलांसह नातेवाईकांशी चर्चा झाली. दुसऱ्या मुलांचे आयुष्य वाचवण्यासाठी रोलीचं अवयव दान करण्याची परवानगी डॉक्टरांनी तिच्या आई वडिलांकडे मागितली. त्यानंतर तिचे आई वडील तयार झाले. त्यांनी मुलीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.
अवयव दानाबाबत जास्त काही माहिती नसताना मुलीच्या आई वडिलांनी जो कौतुकास्पद निर्णय घेतला त्याबद्दल डॉक्टरांनी तिच्या आई वडिलांचे आभार मानले. कारण त्यांच्या मुलीच्या अवयव दानामुळे ५ लोकांचे जीव वाचणार होते ते महत्त्व त्यांना कळालं. मुलीच्या अवयव दानानंतर तिचे वडील हरनारायण प्रजापती म्हणाले की, डॉ. गुप्ता आणि त्यांच्या टीमने आम्हाला अवयव दानाचं महत्व पटवून दिले. आमच्या मुलीमुळे इतर ५ जणांचे आयुष्य वाचू शकतं. त्याचा आम्ही विचार केला आणि आमची मुलगी इतरांच्या रुपाने जिवंत राहील यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. आता या ५ लोकांना नवं आयुष्य मिळणार आहे असं त्यांनी सांगितले. तर भलेही आमची मुलगी आमच्यामध्ये नाही परंतु ती दुसऱ्या लोकांचे जीव वाचवण्यासाठी यशस्वी झाली अशी भावना तिची आई पूनमदेवीनं व्यक्त केल्या आहेत.