मध्य प्रदेशात ६० लाख बोगस मतदार; चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 01:15 AM2018-06-04T01:15:42+5:302018-06-04T01:15:42+5:30
मध्य प्रदेशात ६० लाख बोगस मतदार असल्याचा आरोप काँग्रेसने केल्यानंतर निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन बोगस मतदारांबाबत तक्रार केली आहे.
नवी दिल्ली : मध्य प्रदेशात ६० लाख बोगस मतदार असल्याचा आरोप काँग्रेसने केल्यानंतर निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन बोगस मतदारांबाबत तक्रार केली आहे. काँग्रेसने हा आरोप करताना निवडणूक आयोगाकडे याबाबत पुरावे सादर केले आहेत.
मध्य प्रदेशात ५ कोटी मतदार असून काँग्रेसने केलेल्या दाव्यानुसार, यातील १२ टक्के मतदार बोगस आहेत. गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील मतांचा फरक हा ८.५ टक्के इतका होता. या वर्षी नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना कमलनाथ आणि शिंदे यांनी याबाबत अनेक उदाहरणे दाखविली. उदाहरणार्थ, मध्य प्रदेशातील भोजपूर मतदारसंघात एका महिलेचे नाव वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर २६ वेळा आहे. कमलनाथ म्हणाले की, आयोगाला आम्ही पुरावे दिले आहेत की, राज्यात ६० लाख बोगस मतदार आहेत आणि हे चुकून झालेले नाही. राज्यातील भाजपा सरकारच्या आदेशावरून हे झाले आहे.
चौकशीसाठी दोन पथके
मध्यप्रदेशात ६० लाख बोगस मतदार असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी पुराव्यासह केल्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन पथकांची स्थापना केली आहे. या पथकांकडून ७ जूनपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे. आयोगाने म्हटले आहे की, जर हेतुपुरस्सर चूक दिसून आली तर, उचित कारवाई करण्यास जबाबदारी निश्चित करण्यात येईल.
काँग्रेसने १०१ मतदारसंघांत २४.६५ लाख बोगस मतदार शोधले. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढली त्या तुलनेत मतदारांची संख्या विसंगती दर्शवित आहे. हा प्रकार भाजपाकडून करण्यात आला. १० वर्षांत लोकसंख्या २४ टक्क्यांनी वाढत असेल तर मतदार ४० टक्के कसे वाढू शकतात, असा सवालही शिंदे यांनी केला आहे.