६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 08:13 AM2024-05-18T08:13:10+5:302024-05-18T08:13:29+5:30
मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हे सर्वजण उत्तर प्रदेशमधील मथुरा वृंदावनला गेले होते. तिथून ते माघारी परतत होते.
हरियाणाच्या नूंहमध्ये आज पहाटे भीषण दुर्घटना घडली आहे. एका प्रवासी बसला आग लागून ८ जणांचा जळून मृत्यू झाला आहे. तर २४ जण गंभीररित्या भाजले आहेत. आग लागली तेव्हा या बसमध्ये ६० लोक होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
सर्व गंभीर प्रवाशांना मेडिकल कॉलेज नलहड नूंहमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व प्रवाशी हे नातेवाईक होते व ते एका धार्मिक यात्रेसाठी जात होते. हे सर्वजण लुधियाना आणि होशियारपूरचे राहणारे होते. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हे सर्वजण उत्तर प्रदेशमधील मथुरा वृंदावनला गेले होते. तिथून ते माघारी परतत होते.
कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेस वे वरून प्रवास करत असताना अचानक बसने पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्ररुप घेतले. यामुळे झोपेत असलेल्या प्रवाशांना सावरायला वेळ मिळाला नाही. काही व्हिडीओंमध्ये जळत्या बसमधून प्रवाशांचे ओरडणे ऐकायला येत आहे.