६०० कोटींचा गैरव्यवहार सापडल्याचा दावा खोटा, ‘ईडी’ने पुरावे द्यावेत: तेजस्वी यादवांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 05:43 AM2023-03-13T05:43:03+5:302023-03-13T05:43:45+5:30
ईडीने सांगितले की, १ कोटी रोख, १९०० डॉलर, ५४० ग्रॅम सोने आणि दीड किलो सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : राजद प्रमुख लालू यादव यांच्या कुटुंबावर ईडीच्या छापेमारीतून ६०० कोटी रुपयांचे आर्थिक गुन्हे उघडकीस आल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केला आहे, तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भ्रामक अफवा पसरविण्याऐवजी किंवा सूत्रांच्या हवाल्याने बातम्या पसवण्याऐवजी भाजपने छापा टाकल्यानंतर स्वाक्षरी केलेला पंचनामाच सार्वजनिक करावा, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
राजदने १५० कोटींचा बंगला चार४ लाखांना विकत घेतल्याच्या प्रकरणात ईडीला ट्विटरवर ३ प्रश्न विचारले आहेत. १५० कोटींचे घर फक्त ४ लाखांत खरेदी केल्याचे पुरावे द्या,१५-२० वर्षांपूर्वीच्या घराची किंमत आणि आजची किंमत सारखीच आहे का? इमारत विकत घेता येते, घर नाही, हे आरोप करणाऱ्यांना कळणार नाही. भाजप आता, कथित ६०० कोटींचा हिशेब करण्यापूर्वी, तुम्ही याचाही हिशेब दिला असता तर बरे झाले असते, असेही तेजस्वी यादव म्हणाले.
१ कोटी कॅश जप्त
ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये तेजस्वी यादव यांच्यासह तपास पथक लालू यादव यांच्या मुलींच्या घरीही पोहोचले होते. ईडीने सांगितले की १ कोटी रोख, १९०० डॉलर, ५४० ग्रॅम सोने आणि दीड किलो सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"