'600 मदरसे बंद केले, आणखी 300 बंद करणार'; हिमंता बिस्वा सरमांचा ओवेसींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 11:23 PM2023-05-14T23:23:10+5:302023-05-14T23:23:58+5:30
तेलंगणामधून हिमंत बिस्वा सरमांची ओवेसींवर टीका.
हैदराबाद: तेलंगणामध्ये भाजपने आयोजित केलेल्या हिंदू एकता रॅलीमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) सहभागी झाले होते. यादरम्यान आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर थेट निशाणा साधला. 'सरकार लव्ह जिहादला रोखण्यासाठी काम करत आहे. यावर्षी 300 मदरशांवर कारवाई करणार, अशी टीका बिस्वा सरमा यांनी केली.
रॅलीत पुढे बोलताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, 'आम्ही आसाममध्ये लव्ह जिहादच्या विरोधात काम करत आहोत. आसाममधील मदरसे बंद करण्याचे काम आमचे सरकार करत आहे. मला ओवेसींना सांगायचे आहे की, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आसाममधील 600 मदरसे बंद केले. आता यावर्षी आणखी 300 मदरसे बंद करणार आहे.'
#WATCH | Telangana: "We're working to stop love jihad in Assam, and we're also working towards closing down Madrassas in Assam. After I became CM, I closed 600 Madrassas in Assam...I want to tell Owaisi that I will close 300 more Madrassas this year...":Assam CM Himanta Biswa… pic.twitter.com/mPm8c4BKpc
— ANI (@ANI) May 14, 2023
मदरशांवर काय म्हणाले होते ओवेसी?
यापूर्वी असदुद्दीन ओवेसी यांनी आसाममधील मदरशांवर सुरू असलेल्या कारवाईबाबत वक्तव्य केले होते. या वर्षी जानेवारी महिन्यात ओवेसी यांनी ट्विट केले होते की, 'आसाम हा परदेशी देश नाही जिथे भारतीयांनी तुमच्याकडून परवानगी घ्यावी. भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा लोकांचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे. आरएसएस संचालित शाळांमधील शिक्षकांचे काय? आसाममधील लोकांवर इतर राज्यांनीही असेच नियम लागू केले तर? असे ट्विट त्यांनी केले होते.
काँग्रेसच्या कर्नाटक विजयावर टोला
दरम्यान, हिमंता बिस्वा सरमा यांनी कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयावर खिल्ली उडवली. भाजपची सचिन तेंडुलकरशी तुलना करताना ते म्हणाले की, कधी कधी तो शून्यावरही आऊट होतो. काँग्रेसने एक राज्य जिंकले आणि एवढा गाजावाजा करत आहे. भाजपने अनेक राज्ये जिंकली, पण असा गाजावाजा केला नाही.