महाराष्ट्रातील ६०० पर्यटक सुखरूप

By admin | Published: April 26, 2015 02:08 AM2015-04-26T02:08:48+5:302015-04-26T02:08:48+5:30

नेपाळमध्ये महाराष्ट्रातील ६०० पर्यटक असून, ते सारेच सुरक्षित असल्याचे सरकारी स्तरावर सांगण्यात येत आहे.

600 tourists safely in Maharashtra | महाराष्ट्रातील ६०० पर्यटक सुखरूप

महाराष्ट्रातील ६०० पर्यटक सुखरूप

Next

नवी दिल्ली/मुंबई : नेपाळमध्ये महाराष्ट्रातील ६०० पर्यटक असून, ते सारेच सुरक्षित असल्याचे सरकारी स्तरावर सांगण्यात येत आहे. मुंबई, नागपूर व पुण्यातील नागरिक मोठ्या संख्येने पर्यटनास गेले होते. याशिवाय खासगी पर्यटन कंपन्यांकडून आणि कुटुंबांसह पर्यटनासाठी गेलेल्यांचा शोध बारत सरकारच्या मदतीने राज्य सरकारचे अधिकारी घेत आहेत.
मुंबईहून महापालिकेतील एक कर्मचारी श्रुती भोसले यांनी मदत कक्षाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. पुण्यातील ११ जणांचा एक गट, नागपूरचे चार जणांचे एक कुटुंब सुरक्षित असून, त्यांनी नेपाळच्या दूतावासाशी संपर्क साधला आहे. मदत कक्षाने विदेश मंत्रालयाशी संपर्क साधून त्यांची माहिती मागितली आहे. मुंबईतील काही टूर कंपन्यांनी त्यांच्या टूर व्यवस्थापकांशी संपर्क साधून सुरक्षित असल्याची खात्री केल्याने त्यांच्याबाबत मदत केंद्राकडे माहिती देण्यात आलेली नाही. अतिरिक्त आयुक्त समीर सहाय यांनी सांगितले, की नेपाळ दूतावासाकडे आपण नियमित संपर्कात असून विदेश व गृह मंत्रालयांच्या निर्देशानुसार मदत केली जात आहे. सदनातील मदत केंद्राच्या ०११-२३३८०३२४, २५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
केसरी टूरचे २८ पर्यटक काठमांडूमध्ये अडकले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक आदी भागातील हे पर्यटक असून, ते सुखरूप आहेत. १८ एप्रिल रोजी टूरमार्फत हे पर्यटक काठमांडू येथे गेले होते. शनिवारी सायंकाळी हे पर्यटक मुंबईमध्ये परतणार होते. त्यापूर्वीच सकाळी भूकंप झाल्याने हे सर्व पर्यटक अडकून पडले आहेत. हे पर्यटक सुखरूप असून राज्य सरकारचे अधिकारीही आमच्या संपर्कात असल्याचे केसरी टूरच्या प्रतिनिधींनी सांगितले. विना वर्ल्डचे ११ पर्यटक नेपाळमधील विविध भागांमध्ये अडकले आहेत. ३ नॉर्थ ईस्ट, १ भूतान, २ नेपाळ आणि ५ सिक्कीम दार्जिलिंगमध्ये आहेत. हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याचे विना वर्ल्डकडून सांगण्यात आले. तसेच भविष्यातील पर्यटन दौरेही नियोजित वेळेत होतील, असेही वर्ल्डने म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)

महाराष्ट्र सदनात मदत कक्ष
महाराष्ट्र सरकारच्यावतीने महाराष्ट्र सदनात मदत कक्ष उभारण्यात आला आहे. तिथे अतिरिक्त आयुक्त समीर सहाय, सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कालपते यांच्यासोबत काही कर्मचारी संपर्काच्या कामात आहेत. दिवसभरात शंभरावर दूरध्वनी तिथे आले. मुंबई महापालिकेतील ४० परिचारकांचा एक गट सहलीसाठी दोन दिवांसापूर्वीच काठमांडूला गेला होता. आज सकाळपासून त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. ते एका हॉटेलात सुरक्षित होते.

कोयना
परिसराला
सौम्य धक्का
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात शनिवारी पहाटे ३ वाजून २ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.० नोंदविली गेली.

नेपाळमध्ये अडकलेल्यांशी संपर्क करता यावा म्हणून बीएसएनएलने लोकल दरात कॉल करण्याची दिली सुविधा.

राज्यातील पर्यटक !
शनिवारच्या विनाशकाली भूकंपाच्या वेळी नेपाळमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या ख्यालीखुशालीचा ‘लोकमत’च्या विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी आढावा घेतला.

नाशिकचे ८३ पर्यटक
नाशिकमधील सिमेन्स कंपनीतील १५ कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय सुखरूप असल्याचे त्यांनी कंपनी प्रशासनाला कळविले आहे. तर चौधरी यात्रा कंपनीच्या माध्यमातून नेपाळ - दार्जिलिंगला गेलेले जिल्ह्यातील ८३ जण सुरक्षित आहेत. त्यातील २९ जण गोरखपूर येथे तर ५४ जण गंगासागर येथे असल्याची माहिती चौधरी यात्रा कंपनीच्या कार्यालयाने दिली.

४९ सोलापूरकर
नेपाळच्या यात्रेला गेलेले सोलापुरातील ४९ यात्रेकरू सुरक्षित असून, शनिवारी ते परतीचा प्रवास सुरू करतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तर सोलापूरच्या चार यात्रेकरूंसह नाशिकचे १७ पर्यटक काठमांडूला गेले असून ते गोरखपूर येथून रेल्वेने परतत आहेत, असे साठे टूर्सचे अरविंद कुलकर्णी यांनी सांगितले.

गोमंतकीय परतले
सहा गोमंतकीयांचा गट काठमांडूत अडकला होता, मात्र गोव्यातून त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने हालचाल केल्याने दिल्लीत परतल्याची माहिती मिळाली आहे.काठमांडूला गोमंतकीय अडकल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळाली.

 

Web Title: 600 tourists safely in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.