पुरीच्या जगन्नाथ मंदिरात जमू शकतील ६ हजार भाविक, ८०० कोटींच्या परिक्रमा प्रकल्पाचे लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:30 PM2024-01-18T12:30:48+5:302024-01-18T12:31:56+5:30
श्रीमंदिर परिक्रमा प्रकल्पाचे पटनायक यांनी पुरीचे गजपती महाराज दिव्यसिंह देब, सुमारे ९० मंदिरांचे प्रतिनिधी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत अनावरण केले.
पुरी : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बुधवारी पुरीच्या ऐतिहासिक श्री जगन्नाथ मंदिराभोवती ८०० कोटी रुपयांच्या श्रीमंदिर परिक्रमा प्रकल्पाचे (हेरिटेज कॉरिडॉर) लोकार्पण केले. श्रीमंदिर परिक्रमा प्रकल्पाचे पटनायक यांनी पुरीचे गजपती महाराज दिव्यसिंह देब, सुमारे ९० मंदिरांचे प्रतिनिधी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत अनावरण केले.
भगवान जगन्नाथ यांच्या आशीर्वादामुळे हा प्रकल्प शक्य झाला, असे मुख्यमंत्री म्हणाले. यात पार्किंग क्षेत्र, नवीन पूल, यात्रेकरूंची गर्दी टाळण्यासाठी रस्ते, विश्रामगृह सुविधा, सामान ठेवण्यासाठी क्लॉक रूम, शौचालये आदी सुविधा ४ हजार कुटुंबांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पुरी हे यात्रेकरूंचे शहर फुलांनी, रंगीबेरंगी दिवे आणि भित्तिचित्रांनी सजले आहे.
असा आहे परिक्रमा प्रकल्प...
ओडिशाच्या पुरी जगन्नाथ मंदिर हेरिटेज कॉरिडॉरचे (श्रीमंदिर प्रकल्प) काम पूर्ण झाले असून हे मंदिर १२ व्या शतकातील देशातील चार धामांपैकी एक आहे. ओडिशा सरकारने उद्घाटन कार्यक्रमासाठी भारत आणि नेपाळमधील एक हजार मंदिरांच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले होते.
प्रकल्पांतर्गत मंदिराला लागून असलेल्या बाह्य भिंतीभोवती (मेघनाद पचेरी) ७५ मीटर रुंद कॉरिडॉर तयार केला आहे. मंदिराभोवती २ किलोमीटरचा श्रीमंदिर परिक्रमा मार्ग तयार करण्यात आला. येथून भाविकांना थेट मंदिराचे दर्शन होणार आहे.